Dilapidated condition of Ayre village municipal school in Dombivli | Loksatta

डोंबिवलीतील आयरे गाव पालिका शाळेची दुरवस्था; विद्यार्थी, शिक्षक धोक्याच्या छताखाली

महिनाभरात प्रशासनाने शाळेची दुरुस्ती केली नाही तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पवित्रा

Dilapidated condition of Ayre village municipal school in Dombivli
डोंबिवलीतील आयरे गाव पालिका शाळेची दुरवस्था

कल्याण डोंबिवली पालिकेची डोंबिवली विभागात आयरे गाव विजयनगर येथे लालबहादूर शास्त्री प्राथमिश शाळा आहे. या शाळेची अनेक वर्ष देखभाल दुरुस्ती न केल्याने या शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. भिंतींचे प्लास्टर पडत आहे. शाळेतील स्वच्छतागृहाच्या मलवाहिन्या तुंबल्या असल्याने शाळेच्या आवारात दुर्गंधी पसरत असल्याने विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आयरे गाव शाखाप्रमुख राकेश राणे यांनी दिली.

हेही वाचा- ठाणे महापालिकेचीही चौकशी आवश्यक, भाजप आमदाराच्या मागणीमुळे मुख्यमंत्री शिंदे समर्थक अस्वस्थ

येत्या महिनाभराच्या कालावधीत आयरे गाव शाळेची देखभाल दुरुस्ती पालिका प्रशासनाने केली नाहीतर मुले, शिक्षकांच्या जीविताचा विचार करुन पालिके समोर आंदोलन केले जाईल, असा इशारा विभागप्रमुख राहुल भगत यांनी दिला आहे. आयरे गाव प्राथमिक शाळेत परिसरातील विद्यार्थी येतात. अनेक वर्ष या शाळेची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे भिंतींचे, छताचे प्लास्टर कोसळत आहे. इमारतीच्या खांबांना तडे गेले आहेत. पावसाळ्यात मुसळधार पाऊस असेल त्यावेळी जीव मुठीत घेऊन याठिकाणी शिकवावे लागते. शाळेची वेळीच डागडुजी करावी म्हणून बांधकाम विभाग, प्रशासनाधिकारी यांना या शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी पत्र लिहिली आहेत. त्याची दखल घेतली जात नाही.

हेही वाचा- ठाणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावर कारवाई कधी ? आमदार संजय केळकर यांची आयुक्तांकडे विचारणा

गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहाची मलवाहिनी तुंबली आहे. सांडपाणी बाहेर वाहून जात नसल्याने तुंबलेल्या पाण्यामुळे शाळेच्या आवारात दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या डासांमुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलवाहिन्या स्वच्छ कराव्यात म्हणून वारंवार मागणी केली जात आहे. त्याकडेही लक्ष दिले जात नाही, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा- “वृत्ती, कार्यातून देशाचे हित हीच राष्ट्रभक्ती”; तुषार गांधी यांची केंद्र सरकारवर टीका

शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण प्रमुख अरविंद बिरमोळे, उप शहर संघटक हरिश्चंद्र पराडकर, विभागप्रमुख राहुल भगत, शाखा प्रमुख राकेश राणे यांनी पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर आयरे गाव पालिका शाळेची दुरुस्ती करुन घ्यावी, अशी मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी शाळेच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. महिनाभराच्या कालावधीत ही कामे पूर्ण केली नाहीत तर मात्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 10:18 IST
Next Story
ठाणे महापालिकेचीही चौकशी आवश्यक, भाजप आमदाराच्या मागणीमुळे मुख्यमंत्री शिंदे समर्थक अस्वस्थ