ठाणे महापालिकेच्या पदरी निराशा

राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी वस्तू आणि सेवा कर तसेच मुद्रांक शुल्काचे अनुदान देण्यात येते.

राज्य सरकारकडून येणारा मदतीचा ओघही आटला; मुद्रांक शुल्क, करोना अनुदानाच्या ५३० कोटी रुपयांची प्रतीक्षा

ठाणे : कर्मचारी पगार तसेच ठेकेदारांची देयके देताना नाकीनऊ आलेल्या ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून येणारा मदतीचा ओघही आटला असून मुद्रांक शुल्क तसेच करोना अनुदानापोटी सरकारकडून अपेक्षित असलेले ५३० कोटी रुपयांचे येणे लवकर मिळावे यासाठी आता प्रशासकीय स्तरावरून मिनतवाऱ्या सुरू झाल्या आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने शहरातील विकासकामांसाठी राज्य सरकारकडून कर्ज काढण्याचा विचार मध्यंतरी सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षाकडून बोलून दाखविण्यात आला होता. प्रत्यक्षात अनुदानाचे पैसेच वेळेवर मिळत नसल्याने सत्ताधारी शिवसेना या मुद्दय़ावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाकडून महापालिकेला दरवर्षी वस्तू आणि सेवा कर तसेच मुद्रांक शुल्काचे अनुदान देण्यात येते. ही रक्कम किती मिळेल याचा अंदाज अर्थसंकल्पामध्ये वर्तविण्यात येतो. वस्तू आणि सेवा कराची रक्कम पालिकेला मिळत असून यातूनच आतापर्यंत पालिकेला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य झाले आहे. परंतु मुद्रांक शुल्काची रक्कम अद्यापही पालिकेला मिळालेली नसून ही रक्कम सुमारे २३० कोटी रुपये आहे. मालमत्ता कर, पाणी देयक आणि इतर विभागाकडून मिळत असलेल्या उत्पन्नातून महापालिका इतर आवश्यक खर्च भागवीत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेला राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्काचे २३० कोटी रुपये मिळण्याची आशा वाटत होती. प्रत्यक्षात मात्र हे अनुदान मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या पदरी निराशा आल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेमार्फत आतापर्यंत करोना प्रतिबंधक उपाययोजना आणि रुग्ण उपचारासाठी ७१० कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केले होते. त्यापैकी काही प्रस्तावांमध्ये अपेक्षित धरण्यात आलेला खर्च कमी झाला तर, काही प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. काही प्रस्ताव रद्दही झाले आहेत. करोना प्रतिबंधक उपाययोजना आणि रुग्ण उपचारासाठी पालिकेने आतापर्यंत २३३ कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेने करोना अनुदानापोटी २०० कोटी रुपये देण्याची मागणी राज्य शासनाकडे यापूर्वीच केली आहे. त्यापैकी महापालिकेला दहा कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर उर्वरित रक्कम अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम मिळविण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा सुरू असला तरी त्याला राज्य शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

मुद्रांक शुल्क आणि करोना अनुदानाची रक्कम महापालिकेला मिळाली तर महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळेल, असे पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

अनुदानाचा आर्थिक दिलासा

ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून २०० कोटीपैकी केवळ १० कोटींचे अनुदान मिळाले आहे. याशिवाय सिडकोने १७ कोटी, एमएमआरडीएने २५ कोटी रुपये पालिकेला अनुदान दिले आहे. यातूनच पालिकेने शहरात करोना रुग्णालये उभारली आहेत. यामुळे पालिकेला या दोन्ही विभागांकडून करोना काळात काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Disappointment of thane municipal corporation workes salary corona ssh

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या