सागर नरेकर, निखिल अहिरे
ठाणे : आधुनिक शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी विविध तंत्रज्ञानासोबत आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेतील व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांवर पडणाऱ्या किडीची माहिती पहिल्याच टप्प्यात मिळवत ती वाढण्यापूर्वीच त्यावर त्वरित उपाययोजना केली जाते आहे. ठाणे जिल्ह्यात नावीन्यपूर्व उपक्रमातून आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून हा प्रयोग गेल्या वर्षभरापासून सुरू असून त्याचा फायदा जिल्ह्यातील पिकांना होतो आहे. जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या भेंडी या पिकाला याचा मोठा फायदा झाला आहे.
शेतकरी मोठय़ा प्रयत्नाने लागवड केलेल्या पिकावर किडीच्या प्रादुर्भाव झाल्याने हाती आलेले पीक वाया जाते. कीड उघडय़ा डोळय़ांना दिसते तोपर्यंत पिकाचे मोठे नुकसान झालेले असते. त्यामुळे या किडीची माहिती लवकर समजणे आवश्यक असते. त्यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून विविध तंत्रांचा वापर केला जातो आहे. ठाणे जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था ( Agriculture technology Management Agency) अर्थात आत्मा आणि जिल्हा कृषी विभाग यांच्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या उपयोगाने भाजी पाल्याची लागवड प्रकल्प राबवण्यात येतो आहे. ज्या ठिकाणी भाज्यांची लागवड करायची आहे, त्या ठिकाणचे पाण्याचे आणि मातीचे नमुने तपासणीसाठी बारामती येथील कृषी केंद्रात पाठविण्यात येतात. त्यानंतर त्या ठिकाणी कोणते पीक लागवडीस योग्य ठरेल त्याबाबत केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत. कृषी विभाग आणि शेतकरी मिळून मार्गदर्शनानुसार लागवडीस सुरुवात करतात. नावीन्यपूर्ण उपक्रम असलेल्या या प्रकल्पात व्हीआर (व्हच्र्युअल रियालिटी) अर्थात आभासी वास्तव या यंत्राद्वारे पिकाची लागवड केल्यानंतर आठ ते पंधरा दिवसांनी पिकांची छायाचित्रे घेतली जातात. घेण्यात आलेली छायाचित्र ही विशेष असतात. यामध्ये साध्या डोळय़ांना दिसत नाहीत अशी कीड असल्यास दिसून येते. उघडय़ा डोळय़ांना जी कीड आठ दिवसांनी दिसेल ती या यंत्रामुळे लवकर दिसून येते. यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी गेल्या वर्षांत ५८ लाख २० हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. ही छायाचित्रे बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात तपासणीसाठी पाठवली जातात. या केंद्रातील तज्ज्ञ याचा अभ्यास करून किडीचा प्रकार आणि उपाययोजना सुचवत असते. ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव बळावण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करता येते. यामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच त्यांच्यावर प्रक्रिया करणे सोपे झाले असून त्यामुळे पिकांचे नुकसान टाळता येणे शक्य झाले आहे.
रसायनमुक्त भाजीपाला
जिल्ह्यातील भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विभाग रसायनमुक्त भाज्या पिकवण्यासाठी प्रोत्साहित करत असून त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून जैव कीटकनाशकांचे वाटप केले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजीपाला खऱ्या अर्थाने विषमुक्त झाला आहे. याद्वारे उपक्रमात मागील वर्षी १०० एकर क्षेत्रावर विविध भाज्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यात भेंडी हे प्रमुख पीक आहे.
गेल्या वर्षी या तंत्राचा वापर करून केलेल्या भाजीपाला लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली. किडीची पहिल्या टप्प्यातच माहिती मिळत असल्याने नुकसान रोखण्यात यश येते आहे. या हंगामातही अशाच पद्धतीचा वापर वाढवण्यावर भर देणे सुरू आहे. – दिलीप नेरकर, प्रकल्प संचालक, आत्मा, ठाणे.