ठाणे : आदित्य ठाकरे यांचे दिशा सालियान मृत्यू, मनसुख हिरेन हत्या आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या या प्रकरणात नाव आले आहे. यामुळे त्यांच्या अटकेची मागणी सीबीआय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी स्पष्ट केले. गरज पडल्यास यासाठी मुंबईत मोर्चाही काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.तर आदित्य ठाकरे यांचे नाव एका महिलेच्या मृत्यू प्रकरणात आहे त्यामुळे त्यांना काय अधिकारी आहे की त्यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची भेट घ्यावी, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर केलेल्या विधानांवर टीका करताना म्हस्के म्हणाले की, ठाण्यात येण्यापूर्वी ठाकरेंनी मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. सभा घेऊ, हे करू, ते करू, अशा वल्गना करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात ठाण्यात आल्यानंतर पाय लावून पळून गेले. परळ, मुलुंड आणि भांडुप येथून माणसे आणून ठाण्यात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन मोठ्या गप्पा मारू नयेत, असा टोला त्यांनी लगावला.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणांचा उल्लेख करत म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या प्रकरणांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी सीबीआयकडे करणार असून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडेही पाठपुरावा करण्यात येईल. गरज पडल्यास मुंबईत मोर्चा काढून ही मागणी लावून धरू, असे म्हस्के यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी बंड करण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला वर्षा बंगल्यावर बोलावून अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मात्र, त्यावर आपला विश्वास नव्हता. त्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला असून, आजही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

ठाणेकरांनी कायम शिवसेनेला विजय मिळवून दिला आहे. मुंबईतील सभा आणि कार्यक्रमांसाठी गर्दी कमी पडत असे, तेव्हा ठाण्यातून किती माणसे येणार, याची उद्धव ठाकरे वाट पाहत असत, असा दावा म्हस्के यांनी केला. ठाण्यातील शिवसैनिकांनी शिवसेनेला नेहमीच ताकद दिली आहे. त्यामुळे ठाण्यात आम्ही गर्दी कुठून आणली, यावरून ठाकरे गटाने प्रश्न उपस्थित करू नयेत, असेही ते म्हणाले.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजा शिंदे आरोपी असतील, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका म्हस्के यांनी मांडली. मात्र, सध्या पोलिसांचा तपास सुरू असून, त्यातून संपूर्ण वस्तुस्थिती समोर येऊ द्यावी. तपासात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, म्हस्के यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या वादाला आणखी धार आली आहे.