कल्याण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक कल्याणचे जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांना ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांमधून दोन वर्षासाठी तडीपार करण्याची नोटीस साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी बजावली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिंदे गटात दाखल होण्यासाठी सगळ्यांनी आपली तत्वे, निष्ठा गहाण ठेवायच्या का असा प्रश्न जिल्हाप्रमुख साळवी यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवलीत बेकायदा बांधकामे जोरात ; सुनीलनगर गोपाळ बाग भागातील बेकायदा इमारत जमीनदोस्त

तडीपाराची नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला साळवी यांनी दुजोरा दिला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ५६ (१) (अब) अन्वये पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. ‘महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुन्हेगारीचे प्रकार आपण केले आहेत. तुमच्या पासून परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सामान्य नागरिक आपल्या विरुध्द साक्ष, जबाब देण्यास पुढे येत नाहीत. अपराध करण्यासाठी तुम्हाला संधी मिळताच तुम्ही सार्वजनिक ठिकाणी मोर्चे, आंदोलन, फलकबाजी करणे असे प्रकार करता. यापुढेही तुम्ही असे प्रकार करण्याच्या प्रयत्नात आहात. तुमच्या विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल १५ गुन्हे दाखल आहेत. यावरुन आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी स्पष्ट होत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा भाग आणि तुम्हाला गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी तुम्हाला ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात येत आहे,’ असे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी नोटिसीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> कल्याण मध्ये दुर्गाडी किल्ल्या जवळ नऊ दिवस वाहतुकीत बदल

घाणेरडे राजकारण
आपल्यावर दाखल गुन्हे हे राजकीय स्वरुपाचे आहेत. काही गुन्हे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हाप्रमुख असतानाच्या काळातील आहेत. सात प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. हे माहिती असताना केवळ आपण शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून अशाप्रकारचे धाकदपटशा दाखविण्यात येत असेल तर आपण तडीपार काय, तुरुंगात जायला तयार आहे, असे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख, धर्मवीर आनंद दिघे यांचे आम्ही तत्वनिष्ठ बिनीचे शिलेदार आहोत. त्यांच्या तत्वाने चालणारे आम्ही निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहोत. ती निष्ठा, तत्व आम्ही सोडत नाहीत म्हणून आमच्यावर अशाप्रकारचा दबाव टाकण्यात येत असेल तर राजकारणातील घाणेरडा अतिशय खालचा हा थर आहे. नितीमत्ता नावाचा प्रकार आता शिल्लक आहे की नाही हा प्रकार पाहिल्यानंतर लक्षात येते. प्रत्येकाने फक्त यांच्याच दबावाखाली राहायचे का. राहत नसेल त्याला पोलीस धाक दाखवून वाकविण्यात येत असेल तर मग यावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण निर्माण करत आहे हे जनतेला सांगायला नको, असे साळवी यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

आपणास तडीपारीची नोटीस मिळाली आहे. आपल्यावरील गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. असे गुन्हे असलेली अनेक राजकीय मंडळी आहेत. मग ते सगळेच तडीपार करणार का. मग आपणासच ही नोटीस का. आपण मंगळवारी आपल्या वकिलासह पोलिसांची भेट घेऊन बाजू मांडणार आहोत. विजय साळवी ,जिल्हाध्यक्ष ,कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dismissal notice to kalyan district head vijay salvi a supporter of party chief uddhav thackeray amy
First published on: 26-09-2022 at 22:51 IST