Premium

ठाण्यात मनसे आणि भाजपात जुंपली, ठाण्यातील डोंगरीपाड्यातील पाणीटंचाई प्रकरण

घोडबंदर येथील डोंगरीपाडा टेकडीवरील नागरिकांना जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आरोपप्रत्यारोपामु‌ळे मनसे आणि भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

Dispute between MNS and BJP
ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. (फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: घोडबंदर येथील डोंगरीपाडा टेकडीवरील नागरिकांना जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आरोपप्रत्यारोपामु‌ळे मनसे आणि भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र आहे. झोपी गेलेले जागे झाले, अशी टिका भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी मनसेवर केली आहे तर, नागरिकांना आमिष दाखविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे भुमीपुजन उरकले का, असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी डुम्बरे यांना प्रतिउत्तर दिले आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली असून या चर्चेनंतर शहरातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी घोडबंदर येथील डोंगरीपाडा परिसराचा नुकताच दौरा केला. तेथील नागरिकांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मागील तीन ते चार वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची माहिती नागरिकांनी जाधव यांना दिली होती. यानंतर मनसेने याप्रश्नी आवाज उठविला होता. डोंगरीपाडा समतानगर, विजय नगरी ऍनेक्स, वसंत लीला या परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी २०१८ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. अद्यापी ते काम अपूर्ण अवस्थेतच असल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेने उपोषणाचा इशारा दिला होता. भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुम्बरे यांच्या प्रभागात डोंगरीपाडा परिसर येत होता. येथील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करून मनसेने अप्रत्यक्षपणे भाजपला लक्ष्य केल्याची चर्चा होती. असे असतानाच, पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडण्यामागचे स्पष्टीकरण देत भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी एका पत्रकाद्वारे मनसेवर टीका केली आहे.

आणखी वाचा-मेट्रो कामादरम्यान हलगर्जीपणा, सळई थेट वाहनात आरपार शिरली

महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून २०१७ मध्ये पाण्याच्या टाकीसाठी ५ कोटी रुपये मंजुर करून घेतले. करोनामु‌ळे काम थांबले. दरम्यानच्या काळात ३० ते ४० टक्के खर्च वाढल्याने कंत्राटदाराने माघार घेतली. अखेर आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर पुन्हा काम सुरु झाले. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत काम पुर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे, असे स्पष्टीकरण डुम्बरे यांनी दिले आहे. तसेच डोंगरीपाड्यातील पाण्याच्या टाकीचे फुकटचे क्रेडीट घेण्यासाठी काहीजणांनी आटापिटा सुरू केला आहे. आंदोलनाची हाक दिली जात आहे. येथे दहा वर्षांपुर्वी तीव्र पाणी टंचाई भेडसावत असताना आंदोलनकर्ते कुठे झोपले होते. आता झोपी गेलेले जागे झाले असून आंदोलनाचा स्टंट करून जनतेची दिशाभुल करीत आहेत, अशी टिका त्यांनी केली आहे. त्यास मनसेनेही प्रतिउत्तर दिल्याने हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा-कल्याण: टिटवाळ्यात महावितरणच्या ठेकेदारावर गोळीबार

डोंगरीपाड्यातील समस्या सोडविण्यासाठी आम्ही १० ते १५ वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहोत. पण नगरसेवक म्हणून काय कामे केली, हे त्यांनी जनतेला सांगावे. तांत्रिक बाबी पुर्ण झाल्या नव्हत्या मग, पाण्याच्या टाकीचे भुमीपुजन का केले. जनतेला आमिष दाखविण्यासाठी का ? तेथील नागरिकांनी आम्हाला बोलविले होते आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही आवाज उठवित आहोत. -रविंद्र मोरे, ठाणे शहराध्यक्ष, मनसे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute between mns and bjp water shortage issue in dongripada in thane mrj