निर्धारित मुदतीत दुरुस्तीचे काम पूर्ण नाही; वाहतूक पोलिसांकडून ९ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल

ठाणे : रस्त्याला भगदाड पडल्याने गेल्या आठवडय़ापासून अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आलेल्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला जमलेले नाही. हे काम ४ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात हे काम अपूर्ण राहिल्याने वाहतूक पोलिसांनी आता ९ ऑगस्टपर्यंत या मार्गावरील वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम विभागाकडून काम पूर्ण होण्याची निश्चित अशी तारीख दिली जात नसल्यामुळे वाहतूक पोलीस विभागही हैराण झाला आहे. घोडबंदर येथेही मेट्रोचे काम बुधवारपासून केले जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या त्रासात भर पडणार आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर रेतीबंदर परिसरात आठवडय़ाभरापूर्वी एक मोठा खड्डा पडला. या मार्गावरील वाहतूक धोकादायक असल्याने वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या उरण जेएनपीटीहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घातली आहे. वाहतूक बदल केल्याने ठाण्यातील विविध मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाह्य़वळण मार्गावरील खड्डा बुजविण्याचे काम वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे प्रवासी आणि वाहतूक पोलीसही त्रासले आहेत. सुरुवातीला या खड्डय़ाची दुरुस्ती ३१ जुलैपर्यंत होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात होते. हा खड्डा दुरुस्त न झाल्याने वाहतूक पोलिसांनी बुधवापर्यंत वाहतूक बदल कायम ठेवले. बुधवारीही हे दुरुस्ती काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील वाहतूक बदल ९ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक शाखेने घेतला आहे.

दरम्यान, मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. खड्डे तात्काळ बुजविले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल वळवी यांनी सांगितले.

चहुबाजूंनी कोंडी

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून घोडबंदर येथील आनंदनगर भागात मेट्रो खांबांच्या निर्माणाचे काम हाती घेतले आहे. हे काम मध्यरात्री होणार आहे. येथेही वाहतूक बदल पोलिसांनी लागू केले आहेत. अवजड वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून भिवंडी किंवा मुंबई-नाशिक महामार्गाने गुजरातच्या दिशेने जाणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी भिवंडी, कापूरबावडी, कॅडबरी जंक्शन परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. रात्री घरी परतणाऱ्या सर्वसामान्य ठाणेकरांचे या वाहतूक कोंडीमुळे हाल होण्याची शक्यता आहे.

विलंबास कारण..

या मार्गावरील पुलावर पडलेला खड्डा हा इतका मोठा आहे की खड्डय़ामधून पुलाखालील रस्ता दिसत आहे. तसेच याच मार्गावरील काही खड्डय़ांमधील सळयाही बाहेर पडल्या आहेत. हे खड्डे पुलाखालील बाजूने भरावे लागत आहेत. त्यामुळे खड्डेभरणीला उशीर होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

अभियंत्यांची टोलवाटोलवी

खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याकडून एक उत्तर तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका अभियंत्याकडून वेगळे उत्तर दिले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांमध्ये असमन्वय असल्यामुळे अधिसूचना वारंवार काढल्या जात असल्याचा आरोप वाहतूक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.