scorecardresearch

ठाणे: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री नको; जिल्हा प्रशासनाचे आदेश

मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते.

ठाणे: नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री नको; जिल्हा प्रशासनाचे आदेश
नायलॉन मांजा (संग्रहित छायाचित्र)

मकरसंक्रात सणानिमित्ताने पंतग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र नायलॉन मांजामुळे पक्ष्यांना व नागरिकांना अनेकदा गंभीर इजा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नायलॉन मांजाची घाऊक व किरकोळ बाजारात विक्री करण्यास मनाई केली आहे. तसेच जिल्ह्यात नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

हेही वाचा >>> पुणे : बेकायदा नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांवर ‘संक्रांत’; गुन्हे शाखेकडून पतंग विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा

मकरसंक्रातीमध्ये नायलॉन मांजामुळे घडणाऱ्या अपघातांची संख्या वाढत असते. बहुतांशी प्रकरणांमध्ये हा मांजा नागरिकांच्या गळ्याचाच वेध घेत असल्याने यात घातक इजा होण्यासह जीव गमवावा लागलेल्या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. औरंगाबाद खंडपीठाने २०२० च्या जनहित याचिकेनुसार नायलॉन मांजा विक्री करण्यास मनाई केली आहे. न्यायालयाकडून देखील नायलॉन मांजाचा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजाचा वापराविरुद्ध उपाय योजना करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचबरोबर पालकांनीही मुलांच्या हाती कुठला मांजा सोपविला जातो आहे, हे बघायला हवे. त्यांना नायलॉन मांजा वापरण्यापासून परावृत्त करावे. या मांजाचा उपयोग किंवा विक्री होत असल्यास जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या