रहिवाशांचे पडले गावात स्थलांतर करणार; पालिकेच्या निर्णयाविरोधात नागरिकांची मानवी साखळी

गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या दिवा रेल्वे स्थानकातील उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील कामाला अखेर सुरुवात झाली असून या दिवा पूर्व भागातील २३ इमारती बाधित होणार आहेत. या इमारतीत राहणाऱ्या सुमारे १ हजार नागरिकांचे पडले गावात स्थलांतर करण्यात येणार आहे. दरम्यान, पडले गावात स्थलांतर करण्याऐवजी दिव्यात स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी या नगरिकांकडून करण्यात येत असून या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी मानवी साखळी करून आंदोलन केले.

दिवा रेल्वे स्थानकात उड्डाणुपूल नसल्याने पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी आजही रेल्वे फाटकाचा वापर केला जातो. हे रेल्वे फाटक ओलांडताना अनेक प्रवाशांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तसेच रेल्वे फाटकामुळे अनेकदा रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम होतो. या ठिकाणी वाहतुकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर दोन वर्षांपूर्वी या पुलाच्या उभारणीच्या कामासाठी निविदा काढण्यात आली. या पुलाची दोन टप्प्यांत उभारणी करण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील पुलाची उभारणी रेल्वे प्रशासनाकडून आणि पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या भागाचे काम ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे.

हा पूल १५ मीटर रुंदीचा बांधण्यात येणार असून पुलाच्या दुतर्फा पदपथ बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या पूर्वेकडील भागाच्या उभारणीचे काम महापालिकेने नुकतेच सुरू केले आहे.

या कामात दिवा पूर्वेकडील रस्त्याच्या कडेला असलेल्या २३ इमारती बाधित होणार आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या १ हजार नागरिकांना महापालिकेने उभारलेल्या पडले गावातील गृह संकुलांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र,

पडले गावात स्थलांतरित करण्याऐवजी दिव्यामध्येच स्थलांतरित करावे, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. या मागणीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दिव्यातील नागरिकांनी मानवी साखळी करून निदर्शने केली. या निदर्शनात मोठय़ा संख्याने नागरिक सहभागी झाले होते.

रहिवाशांचा आग्रह

दिवा उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या इमारतींचा परिसर हा यापूर्वीच महापालिकेच्या क्लस्टर योजनेत पात्र ठरला आहे. मात्र, या २३ इमारतींना क्लस्टर योजनेत पात्र ठरवण्याऐवजी उड्डाणपुलाच्या कामामध्ये बाधित ठरवण्यात येत आहे. त्यामुळे २३ इमारतींना उड्डाणपुलाच्या कामात बाधित ठरवण्याऐवजी त्यांना क्लस्टर योजनेत पात्र ठरवून तेथील नागरिकांचे दिव्यातच पुनर्वसन केले जावे, अशी आमची मागणी असल्याचे जागा हो दिवेकर संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी सांगितले.

पुलाच्या उभारणीचे नियोजन नाहीच

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या दिवा उड्डाणपुलाचे काम महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. असे असले तरी पुलाच्या पश्चिम दिशेच्या कामाचे महापालिकेने अद्याप नियोजनच केलेले नाही. दिव्यातील पूर्व भागापेक्षा पश्चिमेला अधिक बांधकामांचा विळखा असून पश्चिमेला अधिक इमारती बाधित होण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिकेने पश्चिम भागातील पुलाच्या उभारणीचे नियोजनच अद्याप केले नसल्याचा आरोप दिवा भाजपचे पदाधिकारी आदेश भगत यांनी केला आहे.