आयुक्तांच्या विरोधात संताप; उपोषणाचा इशारा

ठाणे महापालिका हद्दीत हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच खड्डे असल्याचा दावा एकीकडे अभियांत्रिकी विभागामार्फत केला जात असला तरी दिवा शहरातील खड्डय़ांना कंटाळून येथील सर्वपक्षीय संघर्ष समितीने खड्डे बुजवा अन्यथा गणेशमूर्ती महापालिका मुख्यालयासमोर आणून ठेवू, असा इशारा गुरुवारी दिला. ठाणे शहरातील ठरावीक भागात आणि उच्चभ्रू वस्तीत रस्त्यांचे रुंदीकरणाची कामे करणाऱ्या महापालिका आयुक्तांना दिव्यातील खड्डे बुजवावेसे का वाट नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रियाही दिवेकरांनी व्यक्त केली.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दिव्यात नवे रस्ते बनविण्यासाठी महापालिकेने काही कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केले आहेत. महापालिका हद्दीचा एक भाग असलेल्या दिव्यातील रहिवाशी विविध नागरी समस्यांनी त्रस्त आहेत. बेकायदा बांधकामांचे आगार असलेला हा संपूर्ण परिसर पायाभूत सुविधांपासूनही वंचित आहे. दिव्यापासून काही अंतरावर मुंबईतील काही बडय़ा बिल्डरांच्या टाऊनशिप उभ्या राहात आहेत. या टाऊनशिपच्या आसपासचा परिसरात विविध विकास प्रकल्पांची आखणी केली जात असताना दिव्यात मात्र रस्ते, पाणी, मलनिस्सारण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसू लागल्या आहेत. महापालिका प्रशासनाने ठाणे शहरात वेगवेगळ्या भागात मोठे रस्ते उभारण्याची कामे सुरू केली आहेत. शहरातील काही बडय़ा बिल्डरांवर कन्स्ट्रक्शन टीडीआरची खैरात पाडत कोटय़वधी रुपयांचे रस्ते तयार करून घेतले जात असल्याचे चित्र रंगविले जात असले तरी कळवा, मुंब्रा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, दिवा अशा भागांमधील रस्त्यांची दुर्दशा झाल्याची टीका आता होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याप्रकरणी थेट महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीवर टीका सुरू केली आहे. असे असताना दिव्यातील समस्यांविरोधात दिवेकर एकवटू लागले असून गणेशोत्सवापूर्वी रस्ते ठीक करा अन्यथा गणेशमूर्ती थेट महापालिका मुख्यालयासमोर आणून ठेवू, असा इशारा ही दिला आहे.

खड्डेमय दिवा

दिवा-आगासन या प्रमुख रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर मुंब्रादेवी कॉलनी रस्त्यावर खड्डे आहेत की खड्डय़ांमध्ये रस्ते बांधले आहेत, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. या खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गणेश आगमन तसेच विसर्जन मिरवणुका काढताना खड्डय़ांमुळे अपघात होण्याची भीती मंडळांकडून व्यक्त होत आहे. येथील खड्डय़ांमुळे त्रस्त झालेल्या दिवावासीयांनी बैलगाडी मोर्चा काढून यापूर्वी महापालिका प्रशासनाचा निषेध केला आहे. गणेशोत्सवापर्यंत खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर महापालिकेच्या ढिसाळ कारभाराची आरती ओवाळली जाईल, असा इशाराही सर्वपक्षीय नेत्यांनी दिला आहे.