Dombivli Diva Fast Local Train Halt Dispute: मध्य रेल्वेवरील कसारा व आसनगाव जलद उपनगरी रेल्वेगाड्यांना डोंबिवली व दिवा येथील थांबे रद्द करण्याची मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअरने केली आहे. मात्र, या मागणीला संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या या रेल्वे प्रवासी संघटनांमध्येच आता नवा वाद पेटला आहे.

संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने या मागणीला तीव्र विरोध केला आहे. तसेच दिव्याचा प्रवासी जितका संयमी आहे, तितकाच तो आपल्या प्रश्नांबाबत जागरूक व आक्रमकही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाच्या हालअपेष्टांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिवा व डोंबिवली या स्थानकांवर जलद उपनगरी रेल्वेगाडीत चढ-उतार करताना तुडुंब गर्दी होते. त्यामुळे दररोज धक्काबुक्की करीत डब्यात चढावे लागते. प्रसंगी हाणामारी व अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम रेल्वेने प्रवासी व्यवस्थापन व वेळेचे नियोजन लक्षात घेऊन काही उपनगरी रेल्वेगाडीचा बोरिवली थांबा रद्द केला आहे. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेने कसारा व आसनगाव जलद उपनगरी गाडीचे डोंबिवली व दिवा येथील थांबे कायमस्वरूपी रद्द करण्याचा विचार करावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.

दिवा व डोंबिवली स्थानकांतून मोठ्या प्रमाणावर प्रवासी उपनगरी रेल्वेगाड्यांत चढ-उतार करतात. मध्य रेल्वेने मुंब्रा परिसरात गाडीचा वेग कमी करण्याव्यतिरिक्त कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेप्रमाणेच बोरिवली स्थानकाबाबत निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे सचिव उमेश विशे यांनी केली आहे. या मागणीस संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी तीव्र विरोध केला आहे.

पश्चिम रेल्वेशी तुलना का?

डोंबिवलीपाठोपाठ दिवा स्थानकातूनही रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. दिव्यातून दररोज सकाळी जवळपास दोन लाख प्रवासी ये-जा करतात. अशा स्थितीत दिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर गर्दीच्या वेळेत अतिरिक्त गाड्या चालविण्याची मागणी केली असती, तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. मात्र, तसे न करता पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाचा दाखला देत दिवा आणि डोंबिवलीच्या थांब्यांची तुलना करण्यात आल्याबद्दल दिव्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

‘अतिरिक्त गाडी सुरू करावी’

बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या व डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाड्यांची संख्या यांची तुलना होऊ शकते का, याचाही विचार करायला हवा होता. आपल्या प्रयत्नांतून दिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर किमान एक अतिरिक्त गाडी सुरू करण्यासाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा असताना डोंबिवली आणि दिवा स्थानकांचे थांबे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचा आम्ही निषेध करतो, असेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कसारा आणि आसनगावहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या ज्या जलद लोकल आहेत, त्या दिवा स्थानकावरूनच पुढे जातात. त्यामुळे दिव्याच्या प्रवाशांचा हा उपलब्ध पर्याय हिरावून घेण्याऐवजी त्यांना अधिक चांगली रेल्वे सेवा कशी मिळेल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही भोईर यांनी म्हटले आहे.