निवडणुकीपूर्वी शिवसेनेची लगबग, भंडार्ली येथे जागा ताब्यात घेण्याचा करार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महापालिका निवडणुकीत आठपेक्षा अधिक प्रभाग असलेल्या दिवा परिसरातील कचराभूमीचा मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने दिवा कचराभूमी बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी जागा ताब्यात घेण्याचा करार गुरुवारी करण्यात आला आहे. १ जानेवारीपासून भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज १,०५० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी १२५ टन कचऱ्यावर विविध प्रकल्पांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती केली जाते. उर्वरित सुमारे ६०० टन ओला कचरा दिवा कचराभूमीवर टाकला जात होता. या कचराभूमीत आग लागण्याचे प्रकार घडत असून या धुरासह दरुगधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यातूनची ही कचराभूमी हटविण्याची मागणी होत होती. मागील निवडणुकीत दिवा भागातून शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत कचराभूमीचा मुद्दा सत्ताधाऱ्यांना अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही बाब लक्षात घेऊन सत्ताधारी शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी जागा भाडय़ाने घेतली आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर जागा ताब्यात घेण्यासंबंधीचा करार गुरुवारी करण्यात आला. या जागेवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवडय़ांत पूर्ण होणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १ जानेवारीपासून हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन असल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला आहे.

दिवा कचराभूमीचे सपाटीकरण

डायघर येथील कचरा प्रकल्प सुरू होण्यासाठी एक वर्षांचा काळ लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी सहा महिन्यांत कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी दिवा कचराभूमीवर जमा झालेला कचरा नेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा प्रकारे दिवा कचराभूमीची जागा पूर्ववत करण्यात येणार आहे. तसेच मोठय़ा गृहसंकुलांना कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प उभारणे गरजेचे असून त्यासाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या कचरा विल्हेवाटीसाठी आमच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे आम्हालाही गृहसंकुलांना सक्ती करता येत नाही. परंतु पालिकेचे नियोजित प्रकल्प सुरू झाल्यानंतर गृहसंकुलांनाही कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणे सक्तीचे करणार असल्याचे आयुक्त शर्मा यांनी सांगितले. 

नव्या कचराभूमीचे नियोजन असे..

  • भंडार्ली येथे कचरा विल्हेवाटीसाठी सुमारे १० एकर इतकी खासगी जागा भाडेतत्त्वावर महापालिकेने घेतली आहे. या जागेसाठी ५ रुपये ५० पैसे या दराने म्हणजेच महिन्याला २० लाख रुपये इतके भाडे जागा मालकांना देण्यात येणार आहेत.
  • सुरुवातीच्या प्रस्तावात एका वर्षांला नऊ कोटी रुपये भाडे आकारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे होती. या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमीन मालकांबरोबर बैठक घेऊन भाडेदर कमी करण्याची विनंती केली होती.
  • प्रकल्पात ओल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे. तर, सुका कचरा वेगळा करून तो पुनर्वापरासाठी दिला जाणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासीयांची कचरा समस्येतून मुक्तता होणार आहे. भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे.

नरेश म्हस्के, महापौर 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diva landfill closed month ysh
First published on: 03-12-2021 at 01:00 IST