ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात एका वृद्धाला मारहाण होत असल्याचे पाहून वाद सोडविण्यास गेलेल्या ५२ वर्षीय प्रवाशाला दोघांनी छत्रीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात संबंधित प्रवाशाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवा येथील मुंब्रा देवी कॉलनी परिसरात ५२ वर्षीय तक्रारदार राहतात. ते घाटकोपर परिसरात रिक्षाचालक म्हणून काम करतात. शुक्रवारी रात्री घाटकोपर रेल्वे स्थानकातून उपनगरी रेल्वेगाडीने ते दिव्याकडे परतत होते. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी दिवा स्थानकात आल्यानंतर ते फलाटावर उतरले. त्यावेळी एका वृद्धाला एक व्यक्ती मारहाण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

हा प्रकार पाहून तक्रारदार वाद सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी मारहाण करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यावर छत्रीने हल्ला केला. तक्रारदार यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित व्यक्तीचा साथीदारही तेथे आला. त्यानंतर दोघांनी मिळून छत्रीने तक्रारदार यांना बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात त्यांना दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. मारहाण केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी तेथून पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी जखमी तक्रारदार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.