ठाणे : दीड वर्षांपासून पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हाल होत असलेल्या दिव्यातील ठाणे महापालिकेच्या शाळेचा पाणीप्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पालकांनी मांडलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर शाळेत पाणीपुरवठा सुरू करण्यासह चार स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सुमारे १,४०० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दिव्यातील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ७९ मध्ये दोन शाळांचे मिळून सुमारे १,४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली होती. त्यातच गेल्या दीड वर्षांपासून पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. आठवडाभरापूर्वी पालकांनी ही समस्या केळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पाठपुरावा केला. त्यानंतर शाळेत चार स्वच्छतागृहे आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या नागरिकांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित १४०व्या ”जनसेवकाचा जनसंवाद” कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेऊन शाळेत पाणी आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली.

अनधिकृत ढाबा बंद

दिव्यातील एका सोसायटीत रहिवाशांना विश्वासात न घेता रस्ता बंद करून अनधिकृतपणे शेड उभारण्यात आली होती. या शेडमध्ये ढाबा सुरू करण्यात आला होता. रहिवाशांच्या तक्रारीनंतर केळकर यांनी पाठपुरावा केल्याने हा ढाबा बंद करण्यात आला आहे. लवकरच पोलीस बंदोबस्तात शेड हटविण्यात येईल, असे आश्वासन दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांना दिले.

परिचारिकांच्या वेतनाचा प्रश्नही ऐरणीवर

१५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेत ५० हून अधिक जीएनएम परिचारिका गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, समान काम समान वेतनाच्या तत्त्वानुसार त्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि बोनस मिळावा, अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्टॉलधारकांना हॉकर्सच्या वर्गवारीतून मुक्ती

ब्रिटिश काळापासून मुंबईत कायमस्वरूपी व्यवसाय करणाऱ्या १०४ स्टॉलधारकांना महापालिकेने हॉकर्स म्हणून वर्गीकृत केले होते. त्यामुळे या स्टॉलधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर केळकर यांनी मुंबई महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि स्टॉलधारक संघटनेच्या वारंवार बैठका घेतल्या. या पाठपुराव्यानंतर १०४ स्टॉलधारकांची हॉकर्स म्हणून असलेली वर्गवारी रद्द करून त्यांना कायमस्वरूपी स्टॉलधारक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्या अन्य मागण्याही लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला.