डोंबिवली – मध्य रेल्वेच्या दिवा रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत प्रवासी फलाटावरून लोकलमध्ये न चढता रेल्वे मार्गात उतरून उलट दिशेने डब्यात चढून स्वताचा जीव धोक्यात घालत आहेत. अशाप्रकारे प्रवाशांनी प्रवास करू नये म्हणून रेल्वेने रेल्वे मार्गात रूळाजवळ संरक्षित जाळ्या उभारल्या आहेत. त्या जाळ्यांवर उभे राहून जीव धोक्यात घालून प्रवासी लोकलमध्ये चढणे, जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याने याप्रकरणी मध्य रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी भाजपचे डोंबिवलीतील नेते दीपेश म्हात्रे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंकडे केली आहे.
गेल्या वर्षी मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून काही प्रवासी जखमी, तर काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटना ताज्या असताना दिवा रेल्वे स्थानकातील प्रवासी आपल्या जीवाचा, कुटुंबीयांचा विचार न करता जीव धोक्यात घालून, रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना न जुमानता रेल्वे मार्गात उतरून उलट दिशेकडून लोकल पकडत असल्याने सुरक्षिततेचे नियम तोडून हे प्रवासी करत आहेत. त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
स्वस्त घराचे परिणाम
दिवा शहर परिसरात बेसुमार बेकायदा चाळी, इमारती उभ्या राहिल्या आहेत. या भागात कमी किमतीत घर मिळते. त्यामुळे मुंबई परिसरातील बहुतांशी नोकरदार, कष्टकरी वर्ग दिवा शहर परिसरात राहण्यास आला आहे. या वर्गाची उपजीविका मुंबईवर अवलंबून आहे. त्यामुळे यापूर्वी दिवा रेल्वे स्थानकात मद्यपी, दारूचे फुगे विक्रेते, सुरक्षा दलाचा जवान यांच्या शिवाय एकही प्रवासी दिसत नव्हता. रेल्वेच्या नऊ डब्यातून दिवा रेल्वे स्थानकात मोठ्या मुश्किलीने पाच प्रवासी उतरत होते. गेल्या सहा वर्षापासून दिवा शहर परिसरात बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली. वस्ती वाढली. आणि हा वाढीव वस्तीचा भार दिवा रेल्वे स्थानकावर आला आहे.
राजकीय लाभ
दिवा परिसर हा कल्याण लोकसभेचा मतदारसंघ आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. या दिवा रेल्वे स्थानकातून कर्जत, कसारा, टिटवाळा, आसनगाव, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, खोपोली परिसरातून येणाऱ्या लोकल धावतात. सकाळच्या वेळेत या भागातून येणाऱ्या लोकल प्रवासी गर्दीने खचून भरलेल्या असतात. यामधील अनेक जलद लोकलना दिवा रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळेत थांबा नव्हता. दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी काही वर्षापूर्वी जलद लोकल दिवा रेल्वे स्थानकात थांबल्या पाहिजेत म्हणून रेल्वे मार्गात उतरून आंदोलने केली.
या वारंवारच्या आंदोलनामुळे खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईकडे जाणाऱ्या काही जलद लोकलना दिवा रेल्वे स्थानकात थांबा मिळाला. या लोकल अगोदरच कल्याण, डोंबिवली परिसरातून खच्चून भरून येतात. त्यामुळे दिवा स्थानकात थांबा असुनही दिवा स्थानकातील प्रवाशांना फलाटावरून जलद लोकलमध्ये चढता येत नाही. हे प्रवासी रेल्वे मार्गात उतरून उलट दिशेने लोकलमध्ये चढतात. काही दरवाजा, खिडकी, रेल्वेच्या ब्रेक डब्याजवळील दांंड्या धरून जीवघेणा प्रवास करतात. हे दररोजचे चित्र दिवा रेल्वे स्थानकात आहे.
रेल्वे सुरक्षा बळाची कार्यवाही
रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी दररोज रेल्वे मार्गात उतरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चित्रिकरण करून त्यांच्यावर नियमित कारवाई केली तर प्रवाशांचा हा जीवघेणा प्रवास थांबेल, असे अनेक काही जाणकार प्रवाशांनी सांगितले.

