ध्वनिक्षेपकाद्वारे पोलिसांकडून सावधगिरीचे आवाहन

ठाणे : दिवाळी उत्सवानिमित्ताने बुधवारी ठाण्यातील जांभळी नाका, गोखले रोड, राममारुती रोड, पाचपाखाडी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. फुले, कपडे, शोभेच्या वस्तू, मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. पोलिसांकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे तसेच चोरांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले जात होते. मात्र खरेदीसाठी आलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी नव्हती, तसेच अंतर नियमांचेही उल्लंघन झाले होते. गर्दीमुळे स्थानक परिसर, कोर्टनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

ठाणे शहरातील घाऊक बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जांभळी नाका बाजारपेठेत दरवर्षी विविध भागांतून नागरिक खरेदीसाठी येत असतात. गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्साहावर विरजण आले होते. यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने बाजारामध्ये व्यापारी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने बुधवारी सकाळपासूनच जांभळीनाका बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. घोडबंदर, कळवा, कोपरी, वागळे इस्टेट भागातून सकाळपासूनच नागरिक खरेदीसाठी आले होते. जांभळी नाका आणि स्थानक परिसरात शेकडो कपडय़ांची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये ग्राहकांच्या खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. दिवाळी निमित्ताने कपडे खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याची माहिती कपडे विक्री दुकानाचे मालक राहुल गोळेकर यांनी दिली. लक्ष्मी पूजनानिमित्ताने फुले, केरसुणी, फराळ, लाह्या, बत्तासे खरेदीकडेही नागरिकांचा कल दिसून आला. बाजारपेठेतील गर्दीमध्ये चोरांचा सुळसुळाट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पथक बाजारपेठेत फिरत होते. ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू, मोबाइल फोन सांभाळून ठेवण्याचे तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन पोलीस करत होते. नौपाडा येथील गोखले रोड, राममारुती रोड, पाचपाखाडी परिसरातही रांगोळीचे रंग, मिठाई खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते.

गर्दीमुळे वाहतूक कोंडी

बाजारपेठांमधील गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचेही चित्र होते. खरेदीसाठी आलेले काहीजण त्यांची वाहने घेऊन मुख्य बाजारपेठेत येत होते. तर, काही फेरीवाल्यांनीही रस्त्ये आणि पदपथ अडवून त्यांचे बस्ताण मांडले होते. नागरिकांची गर्दी, फेरीवाले त्यात या वाहनांचा भार बाजारपेठेत आल्याने सिडको, जवाहरबाग स्मशानभूमी, अशोक टॉकीज या भागात वाहतूक कोंडी झाली होती. तर जांभळीनाका बाजारपेठेतून बसगाडय़ांना बंदी असल्याने या बसगाडय़ांना टॉवर नाका येथून वाहतूक करण्यास मुभा होती. मात्र, हा मार्गही अरुंद असल्याने टेंभीनाका, टॉवरनाका परिसरातही वाहतूक कोंडी झाली.