दिवाळीचे बाजारवेध : इंधन दरवाढीमुळे पणत्याही महाग

सतत होत असलेल्या इंधन दरवाढीचा परिणाम या वर्षी पणत्यांच्या किमतीवर झालेला आहे.

खण दीपस्तंभ, कलकत्ता जाळी दिवा या पणत्यांना यंदा मागणी

पूर्वा साडविलकर

ठाणे : दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारपेठा सजल्या असून यंदा बाजारात पणत्यांमध्ये खणापासून तयार करण्यात आलेला दीपस्तंभ, कलकत्ता जाळी दिवा यांसह कमल, उंट, बदक, मोर यांच्या प्रतिकृती असलेल्या पणत्यांना मोठी मागणी आहे. सतत होत असलेल्या इंधन दरवाढीचा परिणाम या वर्षी पणत्यांच्या किमतीवर झालेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रंगकाम तसेच नक्षीकाम केलेल्या पणत्यांच्या दरात २० ते ५० रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती ठाण्यातील विक्रेत्यांनी दिली.

यंदाच्या दिवाळीत बाजारात पणत्यांमध्ये विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. विविध नक्षीकाम आणि रंगकाम केलेल्या पणत्यांसह या वर्षी पारंपरिक खणापासून तयार करण्यात आलेल्या दीपस्तंभांना बाजारात मोठी मागणी आहे. ठाण्यातील तुषार सावंत, भूमिका गोडबोले आणि तन्वी सावंत या तरुणांनी मराठी परंपरा आणि कला याची सांगड घालत खण तसेच पुट्ठय़ाचा वापर करून या दीपस्तंभाची निर्मिती केली. ३०० ते ३५० रुपयाला या दीपस्तंभाची विक्री करण्यात येत आहे. बाजारात यंदा मातीपासून तयार करण्यात आलेला जाळी दिवा ग्राहकांचे लक्ष वेधत आहे. कलकत्ता जाळी दिवा म्हणून या दिव्याची सध्या बाजारात विक्री होत आहे. बाजारात १५० रुपयांना या दिव्याची विक्री केली जात आहे. कमळ फुलाच्या आकारातील आणि उंट, बदक, मोर यांच्या आकारातील पणत्याही बाजारात उपलब्ध झाल्या असून या पणत्या १५० ते २५० रुपयांपर्यंत विक्री केल्या जात आहेत, अशी माहिती विक्रेते वसीम देवरिया यांनी दिली.

पणत्यांच्या दरांत २० ते ५० रुपयांनी वाढ

यंदा करोनाचे सावट कमी झाले असले तरी इंधन दरवाढीचा फटका दिवाळीसाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंवर बसलेला पाहायला मिळत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला आहे. परिणामी यंदा रंगीत तसेच नक्षीकाम केलेल्या पणत्यांच्या दरात २० ते ५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. मागील वर्षी २० रुपयांनी विक्री केली जाणारी साधी रंगीत पणती यंदा ४० रुपयांनी विकली जात आहे. तर नक्षीकाम केलेल्या पणत्या मागील वर्षी ५० ते ४०० रुपयांनी विक्री केल्या जात होत्या. या पणत्या आता ७० ते ४५० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Diwali market expensive fuel price ysh

ताज्या बातम्या