ठाणे शहरातील उड्डाण तसेच पादचारी पूलांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन या कामांच्या दर्जा बाबत कोणतीही तडजोड नको, अशी सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना केली. तसेच, कनिष्ठ आणि उप अभियंत्यांनी दररोज प्रकल्पस्थळी भेटी द्याव्यात, असे आदेश देत कामे पूर्ण झाल्यावर दोष दायित्व कालावधीमध्ये कोणतीही मोठी दुरुस्ती निघणार नाही, अशा पद्धतीने कामे करावीत, अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. कंत्राटदारांना कोणतीही सवलत न देता प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा >>>प्रेमप्रकरणाच्या बाचाबाचीतून डोंबिवलीत ठाण्याच्या तरुणीला बेदम मारहाण

ठाणे शहरात सुरु असलेले तसेच प्रस्तावित उड्डाणपुल, पादचारी पूलांच्या कामांचा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी प्रकल्पांचे सादरीकरण करत सद्यस्थितीची माहिती दिली. के व्हीला पुलाचे काम ४० टक्के झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठकीत दिली. तर, या प्रकल्पात २३३ प्रकल्पग्रस्तांचे पूर्नवसन शिल्लक असून ते जलद केले जावे. तसेच, दिवा रेल्वे उड्डाणपूलाच्या पश्चिमेकडील कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने करण्याच्या सुचना आयुक्त बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. प्रलंबित भूसंपादनाचे प्राधान्यक्रम ठरवून दिवसनिहाय पाठपुरावा केला जावा, तसेच, भूसंपादन कामामुळे प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशही त्यांनी दिले. कळवा पुलाच्या एका मार्गिकेची शिल्लक कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिका शहर अभियंता पदी अर्जुन अहिरे

एका बाजूला दर्जाबाबत पुरेशी दक्षता घेत असतानाच, शहर सौदर्यीकरणात कशी भर पडेल, याचा विचार करण्यात यावा. पूलांचे खांब, विजेचे खांब यांची निवड, वैशिष्ट्यपूर्ण रचना यावरही लक्ष द्यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. ऐरोली – काटई नाका रस्ता, देसाई खाडीवरील पूल, आगासन गावातील पोहोच रस्ता यांच्या परवानगी, न्यायालयातील सुनावणी या बाबी तत्काळ मार्गी लागतील, अशा तऱ्हेने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सिंघानिया शाळा पादचारी पुल, घोडबंदर रोड पादचारी पुल, विटावा पादचारी पूल, बाळकुम नाका पादचारी पुल या प्रकल्पांची सद्यस्थिती बद्दल आयुक्तांनी माहिती घेऊन पादचारी पूलांबाबत दक्षतेने कामे करण्याच्या सूचना दिल्या.