डोंबिवली – आपल्या विधानसभा मतदारसंघातील पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण होऊनही स्थानिक आमदार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी याविषयी उघडपणे कोणतेही भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. सत्तेच्या नियंत्रणाखालील पालिका रुग्णालयात सत्ताधारी शिवसेना पक्षाचा एक ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे दादागिरीचा अवलंब करत डाॅक्टरांना मारहाण करतो. याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्थानिक आमदार म्हणून आपली जाहीर भूमिका व्यक्त करणे आवश्यक होते. विधीमंडळ अधिवेशनामुळे किंवा पक्षीय कामाच्या राज्यभरातील दौऱ्यात ते व्यस्त असतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना याविषयी पत्रकार परिषद घेऊन किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपची भूमिका मांडण्यास सांगणे गरजेचे होते.
परंतु, डाॅक्टर मारहाण प्रकरण एवढे संतप्त असताना भाजपचे स्थानिक पक्षीय, पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घडल्या घटनेविषयी एक शब्द उच्चारला नसल्याने नागरिकांमध्ये, खासगी, पालिका डाॅक्टरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी असे काही प्रकार घडले की त्याठिकाणी पीडिताला न्याय मिळून देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, स्थानिक पदाधिकारी तात्काळ प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून धाऊन जातात, मग आपल्या मतदारसंघात एवढी मोठी घटना घडली असताना, राज्यभर त्याचे पडसाद उमटले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी या मारहाण प्रकरणावर मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, याविषयी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून मगच प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी सांगितले
