कल्याण – रस्त्यावरून विरुद्ध मार्गिकेतून मोटार का चालवितो. यामुळे आता अपघात झाला असता, अशी सूचना एका मोटार कार चालक डाॅक्टरने दुसऱ्या मोटारीतील चालकाला केली. त्यावेळी दुसऱ्या मोटारीतील चालकासह इतरांना त्याचा राग आला. त्यांनी मोटारीतून उतरून प्रश्न विचारणाऱ्या डाॅक्टरला ठोसाबुक्का, लोखंडी कड्याने बेदम मारहाण करून जखमी केले.
शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे हा प्रकार घडला. डाॅ. राजेंद्र रामशरन केसरवाणी (४४) असे तक्रारदार डाॅक्टरचे नाव आहे. ते नेतिवली येथे राहतात. याच भागात त्यांचे रुग्णालय आहे. डाॅ. केसरवाणी आपल्या रुग्णालयातून संध्याकाळी सातच्या सुमारास कल्याण पूर्व भागातील सूचकनाका भागातून मोटारीने घरी चालले होते. सूचक नाका येथे डाॅ. केसरवाणी मोटारीने वळण घेत असताना अचानक त्याच मार्गिकेतून चुकीच्या दिशेने एमएच ०५ सीएक्स – २३३३ हा मोटार चालक समोर आला. डाॅक्टरांनी मोटारीचे वेळीच ब्रेक लावल्याने अपघात टळला. डाॅ. केसरवाणी यांनी समोरील चालकाला ‘तू विरुद्ध मार्गिकेतून वाहन का चालवितोस. तुला मार्गिका कळत नाही का’ असा प्रश्न केला. त्यावेळी समोरील वाहनात बसलेल्या एक इसमाने मोटारीतून उतरून तुम्ही आम्हाला का बोलता, असे प्रश्न उपस्थित करून डाॅक्टरांना ठोशाबुक्क्यांनी, हातामधील लोखंडी कड्याने बेदम मारहाण केली.




हेही वाचा – अंबरनाथमध्ये पित्यानेच केली पोटच्या मुलाची हत्या; मृतदेह नाल्यात फेकला
डाॅक्टरांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. डाॅक्टरांना पुन्हा मारण्याची धमकी देऊन मोटार कार चालक तेथून निघून गेला. डाॅक्टरांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार आर. एस. बुधवंत तपास करत आहेत.