कल्याण – कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावर एका भरधाव वेगातील आयशर टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून चाललेल्या एका डाॅक्टरचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ पाटील असे या डाॅक्टरचे नाव आहे. ते म्हारळगाव परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
डाॅ. सोमनाथ पाटील हे आपला वैद्यकीय व्यवसाय आटोपून बुधवारी रात्री उशिरा कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावरून आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी भरधाव वेगातील एका टेम्पो चालकाने डाॅ. सोमनाथ पाटील यांना जोराची धडक दिली. डाॅ. पाटील दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. त्यांच्या दुचाकीचा चुराडा झाला. टेम्पोची धडक जोराने बसल्याने डाॅ. पाटील अत्यवस्थ होऊन रस्त्यावर पडले होते. त्यांना इतर वाहन चालक, पादचाऱ्यांनी रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर घटनास्थळावरून टेम्पो चालक पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे इतर वाहन चालक, पादचाऱ्यांनी त्याला टेम्पोसह अडवून ठेवले. ही माहिती काही जागरूक प्रवाशांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे एक तास या रस्त्यावर वाहन कोंडी झाली.
पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीने पंचनामा केला. आयशर टेम्पो चालक बाॅबी चंदन जुनी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कल्याणमधील शहाड उड्डाण पुलावरून जुन्नर, अहिल्यानगर, मुरबाडकडून येणारे भाजीपाला, फळ आणि इतर मालवाहू टेम्पो भरधाव वेगाने कल्याणकडे येत असतात. काही वाहने परतीच्या वाटेवर असतात. या वाहनांमध्ये नाशिवंत माल असल्याने त्यांना तो विहित वेळेत बाजार समिती आवारात, बाजारपेठांमध्ये उतरावयाचा असतो.
काही वाहन चालकांना हा माल मुंबईतील बाजारपेठा, बाजार समित्यांमध्ये न्यावयाच्या असतो. वेळेत हा माल पोहचला पाहिजे म्हणून या रस्त्यावरून धावणारे टेम्पो चालक सुसाट वेगाने टेम्पो चालवितात. अनेक वेळा या वाहन चालकांचे टेम्पोवरील नियंत्रण सुटते आणि असे अपघात होतात, असे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या एका वाहन चालकाने सांगितले. एका ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
