डॉक्टर कन्येचे हात मूर्ती घडवण्यात मग्न!

दु:खावर मात करीत त्यांची डॉक्टर कन्या स्नेहलने गणेशमूर्ती घडवण्याचा पित्याचा वारसा पुढे चालवण्याचा वसा घेतला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रमेश पाटील

मूर्तिकार पित्याच्या अपूर्ण कामांच्या पूर्णतेचा वसा

गणेशमूर्तीना रंगकाम करीत असताना वाडा येथील स्नेहल कला केंद्रामधील मूर्तिकार वासुदेव ठाकरे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. वाडा तालुक्यातील प्रसिद्ध मूर्तिकार असलेल्या ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे गणेशमूर्ती घडवण्याचे काम अधुरे राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र या दु:खावर मात करीत त्यांची डॉक्टर कन्या स्नेहलने गणेशमूर्ती घडवण्याचा पित्याचा वारसा पुढे चालवण्याचा वसा घेतला आहे.

वयाच्या २० व्या वर्षांपासून विविध ठिकाणी आपली चित्रकला सादर करणारे वासुदेव ठाकरे यांनी १९९१ मध्ये स्वत:च्या घरातच घरगुती गणपती बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर दरवर्षी त्यांचा व्यवसाय बहरत गेला. पालघर, विक्रमगड आणि वाडा या तीन तालुक्यांमधून त्यांनी साकार केलेल्या गणेशमूर्तीना मागणी वाढली. त्यामुळे त्यांनी पाली या गावात ‘स्नेहल कला केंद्र’ या नावाने गणेशमूर्ती घडवण्याचा कारखाना सुरू केला. या कारखान्यात गणपती, गौरी, दुर्गादेवी यांसह विविध देव-देवतांच्या मूर्ती, विविध पुतळे घडवले जातात. गेल्या ३० वर्षांपासून गणेशमूर्ती घडवणे हा प्रमुख व्यवसाय ठाकरे कुटुंबाचा असल्याने या व्यवसायात त्यांच्या पत्नी, दोन्ही मुलींचा सहभाग असायचा. दरवर्षी दोन हजारांहून अधिक गणेशमूर्ती बनवून पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोहोचवण्याचे काम या कला केंद्रातून होत असते.

यंदा गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच या कला केंद्रात मूर्तीचे रंगकाम करत असताना वासुदेव ठाकरे यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. हा या कुटुंबासाठी मोठा धक्का होता. मात्र या धक्क्यातून सावरत त्यांची पत्नी कल्पना आणि डॉक्टर कन्या स्नेहल व निवेदिता यांनी आपल्या पित्याचा वारसा पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. निवेदिताने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टचे शिक्षण घेतले आहे, तर स्नेहलने नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र तरीही त्या दोघी गणेशमूर्ती घडवण्याच्या कामात मग्न आहेत.

गणेशमूर्ती घडवण्याचा व्यवसाय बघतच मोठी झाली आहे. त्यामुळे वडिलांप्रमाणेच या व्यवसायात पारंगत आहे. वडिलांची कायमची आठवण म्हणून मी या व्यावसायाकडे बघणार असून त्यांचा वारसा कायम जपणार आहे.

– डॉ. स्नेहल ठाकरे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Doctor girl hands keep engage in made of idols