जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र महिलांच्या सन्मानाचे कार्यक्रम होत असतानाच बुधवारी भिवंडीतील अंबाडी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंबाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेल्या महिलेवर उपचारासाठी डाॅक्टरच उपलब्ध नसल्याचे समोर आले. महिला दिनाच्या दिवशीच महिला रुग्णाची हेळसांड झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा >>> अंबरनाथ : ग्रामीण भागातील प्रदुषणाची केंद्र उध्वस्त; तहसील प्रशासनाची प्रदुषण नियंत्रण मंडळासह संयुक्त कारवाई
जव्हार येथे ५० वर्षीय चांगुणा वळवी या वास्तव्यास असून त्या भिवंडीतील अंबाडी नाका परिसरात डोक्याला दुखापत झाल्याने जखमी अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यामुळे येथील श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बुधवारी सायंकाळी अंबाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यावेळी रुग्णालयात केवळ सफाई कर्मचारी आणि लिपीक उपस्थित होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक स्वाक्षरी करून सकाळी १० वाजता निघून गेले होते. तर, येथील डाॅक्टर दुपारी केवळ २ वाजेपर्यंत उपस्थित होते. असे येथील कर्मचाऱ्यांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितले. डाॅक्टर उपलब्ध झाले नसल्याने महिलेचे हाल झाले. श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार यांनी त्यांच्या खाजगी वाहनातून महिलेला पुढील उपचारासाठी नेले. अंबाडी ग्रामीण रुग्णालयास २००६ मध्ये मंजूरी मिळाली होती. पंरतु रूग्णालयाला अद्याप इमारत नाही. त्यामुळे भाड्याने दोन हजार चौरस फुटाच्या इमारतीत रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये आता असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याचे श्रमजीवी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले.