डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील स्टार काॅलनीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टरच्या दवाखान्याची अज्ञात इसमांनी जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करून दवाखान्यातील वैद्यकीय सामुग्री, साहित्याची नासधूस केली. मंचाच्या खणात असलेली ४२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी संगीतावाडी, ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील डॉक्टरांच्या दवाखान्यात चोरट्यांनी किमती वैद्यकीय वस्तू चोरून नेल्या होत्या. या प्रकरणांचा तपास सुरू असतानाच डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये राहणारे डॉ. दिनेश अनंत म्हात्रे यांच्या दवाखान्याची तोडफोड अज्ञातांनी केल्याने डॉक्टर, वैदयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दवाखान्यामध्ये दररोज विविध आजाराचे रुग्ण येत असतात. त्यांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत चोरांनी दवाखान्यांना लक्ष्य केल्याने वैद्यकीय व्यसायिक हैराण आहेत.

पोलिसांनी सांगितले, डॉ. दिनेश म्हात्रे यांचा स्टार काॅलनीत शारदा मुकांबिका हाॅटेलसमोर मारुती दर्शन इमारतीत दवाखाना आहे. सकाळ, संध्याकाळ ते याठिकाणी रुग्णसेवा देतात. डॉ. दिनेश हे मुलीच्या वैद्यकीय प्रवेशाच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून डॉ. दिनेश यांच्या हालचालींवर पाळत ठेऊन असलेल्या अनोळखी इसमांनी पहाटेच्या वेळेत जेसीबी आणून दवाखान्याच्या भिंतींची तोडफोड केली. दवाखान्यातील वैद्यकीय साहित्य, फ्रीज, वातानुकुलीत यंत्र, लसीकरणाचे साहित्य, फर्निचरची आसन व्यवस्था सामानाची तोडफोड केली. दवाखान्यातील मंचामध्ये ४२ हजार रुपयांची रक्कम होती. ती रक्कम अनोळखी इसमांनी चोरून नेली. बाहेरगावाहून परत आल्यावर दवाखान्याची तोडफोड झाल्याचे डॉ. दिनेश यांना समजले.

डॉ. दिनेश म्हात्रे यांनी पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना संपर्क करून आपण तोडफोडीची कारवाई केली का, अशी विचारणा केली. त्यांनी आम्ही अशी कोणतीही कारवाई केली नाही. आमची यंत्रणा नेहमी सकाळी १० ते पाच वेळेत काम करत असते, असे सांगितले. त्यामुळे हेतुपुरस्सर दवाखान्याची तोडफोड करून रुग्ण सेवेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात इसमांविरुध्द डॉ. दिनेश म्हात्रे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या दवाखान्याच्या आजुबाजुला असलेले सीसीटीव्ही चित्रिकरण पाहून पोलीस इसमांचा शोध घेत आहेत. इमारत पुनर्विकास विषयातून ही घटना घडल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. डॉ. म्हात्रे यांनी यासंदर्भात आपण पोलीस ठाण्यातील तक्रारी बरोबर कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार आहे, असे सांगितले.