किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : रुग्णालयात उपचार घेत असताना दररोज सकाळ संध्याकाळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा चौकशीसाठी मला दूरध्वनी येत असे. त्यांच्याकडून तब्येतीची विचारपूस होत असे. डॉक्टर, परिचारिकाही मला लवकर बरे व्हाल, असे सांगून मानसिक आधार देत असत. हा मानसिक आधार, माझ्यातील  इच्छाशक्ती, सकारात्मक विचार आणि प्राणायामामुळे आज मी ठणठणीत बरा झालो आहे. करोना अटोक्यात रहावा यासाठी रात्र-दिवस झटणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे देवदूत आहेत. त्यांना साथ द्या, असे भावनिक आवाहन करोनाशीयशस्वी झुंज देऊन बरे होऊन परतलेले मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड (५१) यांनी केले.

करोनाची लागण झालेले कड मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे दररोज डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलणे होत असे. त्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत गेली, असे कड यांनी सांगितले. तसेच दररोज वेळ मिळाल्यास एक तास प्राणायाम करत असे. त्यामुळे इच्छाशक्ती वाढत होती. असे त्यांनी सांगितले.