जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांचे प्रतिपादन

अनधिकृत कामांना पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतात. विधायक कामे करताना आलेल्या अडचणींशी सामना करताना आजवर कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत आणि यापुढेही करणार नाही, असे प्रतिपादन ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी केले. आचार्य अत्रे कट्टय़ावरील कार्यक्रमात ‘ठाण्यातील आव्हाने’ या विषयावर बोलताना त्यांनी स्वानुभवांचे कथन केले. तसेच त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या अजित सक्सेना यांनी दिलेल्या चतु:सूत्रीचा उल्लेख करत त्या आजही पाळत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ावर बुधवारी महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जोशी यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होण्यापूर्वीची पाश्र्वभूमी आणि सेवेत आल्यानंतरचे अनुभव कथन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासाची सुरुवात करताना इंडियन रेल्वे ट्राफिक सव्‍‌र्हिसेसचे वरिष्ठ अधिकारी अजित सक्सेना यांचे मार्गदर्शन लाभल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘पळू ही नका आणि भोगू ही नका, ज्यामध्ये राम नाही ते आमचे काम नाही, आई-वडिलांच्या पापामध्येही वाटेकरी होऊ नका आणि परमेश्वराकडे डॉलरही चालत नाहीत, ही चतु:सूत्री सक्सेना यांनी मार्गदर्शन करताना दिली आणि आपण ती आजही पाळत असल्याचे जोशी यांनी सांगितले. ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्य़ातील चाळ माफिया, रेती माफिया, बांधकाम साहित्याचे डोंगर तयार करणाऱ्या डेब्रीज माफियांवर कारवाई करण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यावर आळा घालण्यासाठी पर्यावरणीय कायद्याचा वापर करून अत्यंत कठोर कारवाई केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच येथील सुजाण नागरिकांनीही ‘वी से नो टू डेब्रिज डंपिंग’ यासारख्या काही चळवळी सुरू कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. आयएएस अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या झाल्या. आजपर्यंतच्या प्रत्येक बदलीने प्रत्येकवेळी एक वेगळे आव्हान उभे केले. ही आव्हाने विविध योजनांच्या आणि कारवायांच्या माध्यामातून यशस्वीरीत्या पूर्ण केली, असेही त्या म्हणाल्या.

आव्हानांतून शिकले!

‘सुरुवातीपासूनच आव्हाने स्वीकारली व ती आजही स्वीकारतेय, त्यातून भरपूर शिकायला मिळाले’, असे त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले. विधायक कामे करताना आलेल्या अनेक अडचणींशी संघर्ष केला. अशावेळी कोणतीही तडजोडीची भूमिका घ्यायची नाही असे ठामपणे ठरवले होते आणि ते आजवर पाळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्य़ामध्ये वेगळ्या कामाचा ठसा उमटवण्याची संधी मिळाली. आपण जे काय करतो आहोत, त्यात स्पष्टपणा, विकासात्मक दृष्टिकोन आहे. हे स्पष्ट असल्याने विरोधाची कोणतीच भीती वाटत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ठाण्यातील समस्यांवर तोडगा काढू..

सध्या ठाणे जिल्ह्य़ामध्ये सुरु असलेल्या अवैध रेती उपसा, अनधिकृत बांधकाम, पाणी टंचाई यासारख्या समस्यांवर भाष्य करताना, आपण यावर नक्कीच आश्वासक तोडगा काढू असेही त्या म्हणाल्या. लोकसहभागातून विधायक कामे होत असतात. त्यामुळे कामांमध्ये पारदर्शकता आणि लोक सहभाग वाढावा यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन दिले.