scorecardresearch

ठाण्यात तीन वर्षांनंतर श्वान निर्बीजीकरण मोहीम; पुढील महिन्यापासून सुरुवात

तीन वर्षांपूर्वी या कामाचा ठेका संपुष्टात आल्यानंतर संबंधित संस्थेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता

street dogs
प्रातिनिधिक छायाचित्र

पुढील महिन्यापासून सुरुवात

ठाणे : शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ होत असल्याची ओरड होऊ लागताच, महापालिका प्रशासनाने मार्चच्या पहिल्या आठवडय़ापासून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरणाचे काम सुरू करण्याची तयारी केली आहे. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारी श्वान निर्बीजीकरण मोहीम गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.

खासगी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामासाठी पालिका दीड कोटी रुपये खर्च करणार असून त्यात एका श्वानाच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसाठी १६४० रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

संपूर्ण महापालिका क्षेत्रात २००४ ते २०१९ या कालावधीत आठ कोटी रुपये खर्च करून ५८ हजार ५३७ भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या मोहिमेनंतरही शहरात श्वानांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आरोप लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभांमध्ये केले होते. त्यामुळे ही मोहीमच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

तीन वर्षांपूर्वी या कामाचा ठेका संपुष्टात आल्यानंतर संबंधित संस्थेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. लोकप्रतिनिधींनी मुदतवाढ देण्यास नकार देऊन नव्याने निविदा काढण्याची सूचना केली होती. त्यानंतर पालिकेने नव्याने निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. दीड कोटी रुपयांचा हा प्रस्ताव होता. या प्रस्तावातील श्वान निर्बीजीकरणाचे दर जास्त असल्याचा दावा करत लोकप्रतिनिधींनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सुरुवातीला हा प्रस्ताव रखडला होता. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी प्रस्तावास मंजुरी दिली. या प्रस्तावास मंजुरी मिळूनही दोन वर्षांचा काळ लोटला तरी कामाच्या निविदा अंतिम होऊ शकल्या  नव्हत्या. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण बंद होते.

याच मुद्दय़ावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागताच पालिका प्रशासनाने या कामाच्या निविदा आता अंतिम करत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली आहे. या संदर्भात महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. दोन वाहनांच्या माध्यमातून भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dog sterilization drive in thane after three years akp

ताज्या बातम्या