ठाणे : प्रख्यात डोगरी साहित्यिक, कवी आणि चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांचे रविवारी सकाळी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ठाणे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ योगदान देणाऱ्या राही यांनी २५ हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवादलेखन केले होते. तसेच पाच चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.

त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. वेद राही यांचा जन्म २२ मे १९३३ रोजी जम्मू येथे झाला. त्यांचे वडील मुल्क राज सराफ हे प्रसिद्ध पत्रकार होते. जम्मू-काश्मीर संस्थानातील पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रणबीर’चे ते संस्थापक होते. वडिलांकडून मिळालेला साहित्य आणि पत्रकारितेचा वारसा तसेच लहानपणापासूनच भाषा, संस्कृती, समाज आणि मानवी भावविश्वाविषयी असलेली संवेदनशीलता यामुळे राही यांचा साहित्यिक प्रवास घडत गेला. त्यांनी उर्दू भाषेतून लेखनास सुरुवात केली. पुढे डोगरी आणि हिंदी या भाषांमधूनही त्यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. काले हट्ठे, गर्भ जूण, आले, लाल देद, हड बेडी ते पट्टन या त्यांच्या साहित्यकृती विशेष उल्लेखनीय आहेत.

साहित्याप्रमाणेच चित्रपट क्षेत्रातही वेद राही यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ये रात फिर ना आयेगी, पवित्र पापी, आप आए बहार आयी, पराया धन, बेईमान, मोम की गुडिया, प्रेम पर्वत, संन्यासी, चरस आणि बेजुबाँ यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी कथा, पटकथा आणि संवादलेखन केले. दरार, प्रेम पर्वत आणि काली घटा या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर या चित्रपटाचे २००१ मध्ये त्यांनी दिग्दर्शन केले. दूरदर्शनवरील ‘गुल गुलशन गुलफाम’ ही काश्मिरी कुटुंबावर आधारित मालिका विशेष लोकप्रिय ठरली होती. यासह जिंदगी, ऋष्ते, कथा सागर, संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मीराबाई’ या मालिकांचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते.

वेद राही यांना साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. १९७१ मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला. ‘आले’ या डोगरी कथासंग्रहासाठी १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कारासह जम्मू-काश्मीर कला, संस्कृती आणि भाषा अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. २०११ मध्ये महापंडित राहुल सांकृत्यायन पुरस्कार, तर २०१५ मध्ये अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. डोगरी कवितेतील योगदानासाठी २०१८ मध्ये ”दीनू भाई पंत पुरस्कार” आणि ”कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार” त्यांना प्रदान करण्यात आला. १२ डिसेंबर २०२४ रोजी साहित्य अकादमीच्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेल्या ”मानद सदस्यत्वा”ने त्यांना गौरविण्यात आले होते.