कल्याण- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १० प्रभाग हद्दीतील गटार सफाईचे कामे मजूर कामगार संस्थांच्या कामगारांकडून योग्यरीतीने, वेळेत पूर्ण करण्यात आली नाहीत. आता थोडा पाऊस पडला तरी डोंबिवली, कल्याणमधील काही भागातील रस्ते पाण्याखाली जाऊन रहिवाशांना फटका बसत आहे. अनेक ठिकाणी गटारांमधील गाळ वर्षानुवर्ष न काढल्याने ती माती, प्लास्टिक पिशव्यांनी भरुन गेली आहेत. या भागातून पाणी प्रवाहीत होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येते.

प्रभागांमधील गटार सफाईची कामे राजकीय आशीर्वाद असलेल्या मजूर कामगार संस्थांकडून केली जातात. बहुतांशी मजूर कामगार संस्था काही नगरसेवकांच्या आशीर्वादाने पालिकेत वर्षानुवर्ष काम करतात. गटार सफाईचे थोडे काम करुन पूर्ण काम केल्याचे देयक काढून घेण्याची वर्षानुवर्षाची परंपरा पालिकेत आहे.

गटार सफाईची कामे योग्यरीतीने न केल्याने अनेक ठिकाणी गटारे माती, गाळ, प्लास्टिक पिशव्यांनी बंदिस्त झाली आहेत. तेथे पाण्याचा प्रवाह अडला जातो. ते पाणी रस्त्यावर येते. डोंबिवली पूर्वेत त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी, शेलार नाका चौकातील गटारे वर्षानुवर्ष मजुर कामगार संस्थांनी साफ केली नाहीत. गटारात गाळ, प्लास्टिक, कचरा अडकून गटारात कडक भिंत तयार झाली आहे. तेथे पाण्याचा प्रवाह अडकून राहतो. थोडा पाऊस पडला तरी ते पाणी पाठीमागे येऊन रस्त्यावरील शेलार चौकातील खळग्यात साचते. या साचलेल्या पाण्यातून वाहने नेणे चालकांना अवघड होते. या भागात कोंडी होते. गटारातील कडक कचऱ्याची भिंत काढण्यासाठी दोन दिवसांपासून कामगारांच्या साहाय्याने जलनिस्सारण विभागाचे अभियंता शिरीषकुमार नाकवे, साहाय्यक आयुक्त संजय जाधव प्रयत्न करत आहेत. कामगारांच्या प्रयत्नातून हे काम होत नसल्याने हवा दाब सयंत्र मागवून गटारातील पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाटकर रस्त्यावर पर्यायी व्यवस्था

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रस्ता खचला होता. या रस्त्याखाली गटार आहे. गटारात विविध प्रकारच्या सेवावाहिन्या आहेत. पावसात या वर्दळीच्या रस्त्यावर काम सुरू केले तर पादचारी, व्यापारी आणि वाहन चालकांना त्रास होईल. हा विचार करुन जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता विजय पाटील, साहाय्यक अभियंता शिरिषकुमार नाकवे यांनी या गटारत तात्पुरती सांडपाणी वाहून जाण्यासाठी वाहिनी टाकली आहे. गटारावर पाणी वाहून जाण्यासाठी लोखंडी जाळी टाकली आहे. ३५ वर्षापासून या भागात काम न केल्याने या रस्त्याखाली गुंतागुंत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याणमध्ये पाणी

बिर्ला महाविदयालय रस्त्यावरील प्रशांत हाॅटेलजवळ गटार सफाईची कामे व्यवस्थित न झाल्याने या भागात पाणी रस्त्यावर, परिसरातील सोसायट्यांमध्ये जमा होते. गटार सफाईच्या कामांवर साहाय्यक आयुक्त, आरोग्य निरीक्षक नियंत्रण ठेवत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत.

नाले, गटार सफाई सुरुच

कल्याणमधील ब प्रभागात २९४० मीटर लांब गटारांची सफाई, क प्रभागात २३०० मीटर गटार, जे प्रभागात ९३५ मीटर, ड प्रभागात २२८० मीटर, ह प्रभागात ७६० मीटर, ई प्रभागात १३८० मीटर लांबीच्या गटारांची सफाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील खचलेला रस्ता भागातील गटारावरील रस्त्यावर पर्यायी व्यवस्था केली आहे. पावसाळ्यानंतर या भागातील नाले, रस्ते कामाचे नियोजन करुन मजबुतीचे काम केले जाईल.

– शिरिषकुमार नाकवे साहाय्यक अभियंता