पालिका प्रकल्पाच्या दुरवस्थेचा पूर्व भागातील रहिवासी आणि शालेय विद्यार्थ्यांना फटका; देखभालीचा अभाव
डोंबिवली पूर्व भागातील राजाजी रस्ता परिसरात असलेल्या पालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. या प्रकल्पाची योग्य ती देखभाल करण्यात येत नसल्याने, म्हात्रेनगर, राजाजी रस्ता भागातील रहिवाशांना दरुगधीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या परिसरात शाळा आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना दरुगधीचा सततचा सामना करावा लागत असल्याने शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या संरक्षक भिंती उंच बांधून दरुगधीपासून शाळेची सुटका करून घेतली आहे.
म्हात्रेनगर, राजाजी रस्ता, पंचायत बावडी परिसरातील गृहसंकुलांमधील स्वच्छतागृहांमधील मल प्रक्रिया करण्यासाठी राजाजी रस्ता मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात आणले जाते. अनेक वर्षांपासून या प्रक्रिया केंद्राची दुरवस्था झाली आहे. प्रक्रिया करणारे पंप बिघडले आहेत, काही बंद आहेत, अशी माहिती या भागाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सर्वसाधारण सभेत दिली. या वेळी पालिकेची मलनिस्सारण केंद्रे योग्य क्षमतेने चालतात, असे लेखी खुलासे करणाऱ्या अभियंत्यांची सभागृहात उत्तर देताना भंबेरी उडाली.
प्रक्रिया केंद्रातील पंप दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक असते; परंतु दहा वर्षे उलटली तरी या केंद्रातील पंप बदलण्यात आले नाहीत. केंद्रातील हवा बाहेर घालविण्यासाठी बाह्य़ पंखे नाहीत. प्रक्रिया केंद्रातील विहीर रिकामी असेल तर प्रचंड दरुगधी या भागात पसरते. या भागात नवीन गृहसंकुले झाली आहेत. मढवी शाळा आहे. त्यांना या दरुगधीचा सर्वाधिक त्रास होतो. शाळेने तर दरुगधीचा त्रास नको म्हणून शाळेच्या एका बाजूला मोठी भिंत बांधली आहे. प्रक्रिया केंद्राची दुरवस्था झाली असताना अधिकारी ठेकेदाराची देयके मात्र नियमित काढतात. एकाच ठेकेदाराच्या नियंत्रणाखाली या केंद्राचा कारभार सुरू आहे. त्यामुळे या प्रक्रिया केंद्राची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रशासनाकडे केली.
मल प्रक्रिया बंद पडली की सांडपाणी थेट परिसरातील गटारे, वस्तीमध्ये घुसते. त्यामुळे भागातील जलवाहिन्या मल सांडपाण्याच्या प्रवाहाखाली झाकून जातात. त्यामुळे या भागात दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो.

राजाजी रस्ता मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रात वाहून येणाऱ्या मल सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११० अश्वशक्ती, ५० अश्वशक्ती आणि २० अश्वशक्तीचे पंप आहेत. यामधील ११० अश्वशक्तीचा पंप गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. या पंपाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीत. उर्वरित दोन पंप फक्त एक तास ते अर्धा तास चालतात. त्यामुळे प्रक्रिया केंद्रात येणाऱ्या मल पाण्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया होत नसल्याने मलप्रक्रिया केंद्रातील विहीर सांडपाण्याने भरून राहिल्याने या भागात दरुगधी पसरते.,
-मुकुंद पेडणेकर, नगरसेवक