आफ्रिकेतून परतेल्या नागरिकाला करोना

भगवान मंडलिक

डोंबिवली : गेल्या वर्षी तुर्कस्तान येथून पर्यटनावरून डोंबिवलीत परतलेल्या एका तरुणामुळे शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची नोंद झाली. आठवडाभरापूर्वी आफ्रिकेतून परतलेल्या तरुणाला करोनाची बाधा झाल्यामुळे डोंबिवलीकर चिंताग्रस्त झाले आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत परतलेल्या एका रहिवाशाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच स्थानिक यंत्रणा सतर्क झाल्या. या रहिवाशाची प्रकृती स्थिर असली तरी त्याच्या संपर्कात आलेल्या रहिवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्नही स्थानिक यंत्रणांनी सुरू केला आहे. या व्यक्तीच्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल जनुकीय क्रमनिर्धारणासाठी मुंबईतील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल मिळेपर्यंत या व्यक्तीला आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवले जाणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

दरम्यान, आफ्रिकेतून करोनाबाधित होऊन परतलेल्या या रहिवाशामुळे डोंबिवलीत घबराटीचे वातावरण आहे. आफ्रिकेतून आलेला हा बाधित कोणत्या भागात राहतो याची चौकशी करणारे अनेक दूरध्वनी महापालिकेच्या वेगवेगळ्या विभाग कार्यालयांमध्ये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये सातत्याने येत आहेत. करोनाबाधित झाल्याने हा नोकरदार आधीच तणावात आहे. त्याचे समुपदेशन केले जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा या रुग्णासंदर्भात पसरवून शहरात घबराट पसरवू नये, असे आवाहन डॉ. पानपाटील यांनी केले आहे.

आफ्रिकेतून सात प्रवासी ठाण्यात

ठाणे शहरात १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सात नागरिक दक्षिण आफ्रिकेतून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सातही जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी चार जण करोनाबाधित नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.  ठाणे महापालिकेने १२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतून ठाणे महापालिका क्षेत्रात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, या कालावधीत सात प्रवासी हे दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रवाशांची महापालिकेने करोना चाचणी केली. त्यापैकी  तिघांचा अहवाल सायंकाळी उशिरापर्यंत आला नव्हता.

महापालिका सज्ज

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहून ठाणे महापालिका आता सज्ज झाली आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटा, लहान मुलांसाठी आवश्यक खाटा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली आहे. याशिवाय ज्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. त्यांनी लस घेण्याचे आवाहनही पालिकेने केले आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांच्यासह इतर यंत्रणांची बैठक बोलावली होती.