ऐन सुट्टीच्या हंगामात कल्याण -डोंबिवली महापालिकेचा डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या तलावात तांत्रिक बिघाड निर्माण होताच तो बंद ठेवण्यात आल्याने याठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या तलावातील एका वाहिनीत बिघाड झाला आहे. तसेच पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया कार्यरत नसल्याने तरण तलाव बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी तरण तलावाच्या दिशेने येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला. दरम्यान, सोमवारपासून हा तलाव पोहण्यासाठी खुला करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.
कल्याणमधील आधारवाडी येथील कल्याण स्पोर्ट्स क्लब मधील सुसज्ज तरण तलाव गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या निष्क्रिय भूमिकेमुळे बंद पडला आहे. डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील तरण तलाव गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याचे चित्र असल्यामुळे नागरीकांमध्ये नाराजीचा सूर होता. ‘डोंबिवली शहरातील या तरण तलावासाठी महापालिकेने सदस्यांकडून एकरकमी रक्कम घेऊन सदस्यत्व दिले आहे. गावातच तरण तलावाची सुविधा उपलब्ध असल्याने याठिकाणी पोहण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांची संख्या बरीच मोठी आहे. उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवशी येथे येणाऱ्यांची संख्या बरीच मोठी असते.
या परिस्थितीत तब्बल चार दिवस तरण तलाव बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. सुट्टीचा हंगाम सुरू झाला की नेमका याच काळात तरण तलावाला काहीतरी बाधा होते, असा या पुर्वीचा अनुभव आहे. किमान सुट्टीच्या काळात तरी या सुविधेचा लोकांना चांगला उपभोग घेऊ द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.