डोंबिवली – अंमली पदार्थांचे सेवन करून बेहोष झालेल्या एका तरूणाने दोन दिवसापूर्वी रात्री साडे अकरा वाजण्याच्या वेळेत आपल्या घराच्या गॅलरीत येऊन मोठ्या ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. ही माहिती गस्ती पथकावरील विष्णुनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात या तरूणाची वैद्यकीय तपासणी केल्यावर या तरूणाने अंमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे स्पष्ट झाले.
हर्षद बुधा कांबळे (२८, रा. विश्व सहकार सोसायटी, मुलुंड, मुंबई) असे या तरूणाचे नाव आहे. हा तरूण डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकातील धवनी इमारतीच्या सदनिका क्रमांक ४०३ च्या गॅलरीत येऊन रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान मोठ्याने ओरडा करत होता. रात्रीची वेळ असल्याने कुटुंबीय झोपी गेले होते. काही नोकरदारांना पहाटेच निघावे लागते. अशा परिस्थितीत हर्षद कांबळे आजुबाजुच्या कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता मोठ्याने ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत होता.
परिसरातील नागरिकांनी या तरूणाला घरात जाऊन शांत राहण्याचा सल्ला दिला पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर या भागातील जागरूक नागरिकांनी विष्णुनगर पोलिसांना फोन केला. गस्तीवरील पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांना धवनी इमारतीच्या एका सदनिकेच्या गच्चीत एक तरूण मोठ्याने ओरडा करत असल्याचे दिसले. पोलिसांना पाहूनही तो ओरडा करत होता. त्यामुळे या तरूणाविषयी शंका आल्याने गस्तीवरील पोलीस या सदनिकेत शिरले. त्यांनी या तरूणाला पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही तो आरडाओरडा करत होता. तो मुळचा मुलुंड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी या तरूणाला पहिले विष्णुनगर पोलीस ठाणे नंतर तेथून वैद्यकीय तपासणी पत्र घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात तपासणीसाठी नेले. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर या तरूणाने कोणत्या तरी अंमली पदार्थाचे सेवन केले असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी त्याच्या सेवनाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले. या तरूणावर पोलिसांनी प्रतिबंधित कारवाई केली आहे. या तरूणाला ताब्यात घेतल्यानंतर परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आंबवले, हवालदार दाभाडे, महिला पोलीस शिपाई धोटे सहभागी झाले होते.
