निवडणूक व्यवस्थापन कंपन्यांची सेवा
उमेदवाराचे संकेतस्थळ बनवणे, प्रभाग सर्वेक्षण, जनमत चाचण्यांचे आयोजन, सोशल मीडियातील प्रचार, प्रचार साहित्य बनवणे, वितरित करणे, भ्रमणध्वनीवरून प्रचार, छायाचित्रण, व्हॉटस्अप, फेसबुक व्यवस्थापन, वचननामा बनवणे, प्रचार सभा, सॉफ्टवेअरनिर्मिती, धोरणात्मक निर्णयात तज्ज्ञांची मदत, ऑनलाइन जाहिरात, मोबाइल अॅप, वॉर रूप व्यवस्थापन, शेवटच्या दिवसाच्या मतदान व्यवस्थापनापर्यंत सगळ्या सेवा खासगी तत्त्वावर उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या सेवा उपलब्ध करून देण्यास तयार होऊ लागल्या आहेत. निवडणुकीला उतरणाऱ्या नवख्या उमेदवारालाही विश्वासू सेवा देण्याचा दावा या कंपन्यांकडून केला जात असून पत्रके, पोस्टर, बॅनरच्या माध्यमातून त्यांनी स्वत:चा प्रचार सुरू केला आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांची मदत घेऊन उमेदवाराला हमखास यशाचे आश्वासन या कंपन्या देऊ लागल्या आहेत.
प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा निकाल लागताच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वाऱ्यांनी वेग घेतला आहे. निवडणुकीची व्यूहरचना करण्यासाठी राजकीय पक्षांत बैठकींना जोर चढला आहे तर इच्छुक उमेदवारही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होऊ लागले आहेत. बदललेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक जण संभ्रमात असले तरी त्यांची मदत करण्यासाठी तसेच तरुण, नवख्या उमेदवारांना निवडणूक जिंकण्याचे तंत्र शिकवण्यासाठी राजकीय गुरू अवतरण्यास सुरुवात झाली आहे. प्रभागनिहाय मतदारांची माहिती, जनमत चाचण्या, सोशल मीडियावरील प्रचार अशा सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्या पुढे आल्या असून त्यामध्ये संगणक अभियंत्यांपासून माजी पत्रकारांपर्यंत साऱ्यांचाच भरणा आहे.
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला आपल्या प्रभागाशी संबंधित अनेक गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक असते. लिंग, धर्म, जातनिहाय मतदारांची संख्या, मतदारांचे मूळ गाव, वाढदिवस अशा बाबींच्या आधारे त्यांना प्रचाराची आखणी करता येते. नेमकी हीच बाब हेरून उमेदवारांना ही माहिती पुरवण्यासोबत निवडणूक विजयाचे तंत्र शिकवणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. उमेदवारांना मतदारांची माहिती पुरवण्यासोबतच, निवडणूकपूर्व सर्वेक्षण, जनमत चाचणी, प्रचाराचे मुद्दे, मतदारांना एसएमएस, ईमेल पाठवण्याची सुविधा, सोशल मीडियावरील प्रचार अशा सेवा पुरवण्याच्या मोबदल्यात लाखोंची बिदागी या कंपन्या आकारत आहेत. अनेक माजी पत्रकार, संगणक अभियंते, व्यवस्थापनाचे विद्यार्थी, इव्हेंट कंपन्या या कामांत पुढे आहेत.
काही कंपन्या निवडणुकीस आवश्यक सॉफ्टवेअर, किंवा साहित्य पुरवण्यासाठी पॅकेज देत आहेत. तर काही संस्था संपूर्ण निवडणुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी घेत असून त्यासाठी पाच ते सात लाखांहून अधिक रक्कम आकारली जात आहे. उमेदवारांची क्षमता पाहून त्यांना पॅकेज दिले जात असून त्यानुसार त्यांना दिली जाणारी सेवा कमी-जास्त स्वरूपात होऊ शकणार आहे. पाच वर्षांपूर्वीच्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांना मदत पुरवणाऱ्या कंपन्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी यंदा मात्र ती कमालीची वाढली आहे. शिवाय आत्तापर्यंत केवळ खासगीमध्ये विपणन करणाऱ्या या कंपन्या आता जाहीररीत्या लोकांपर्यंत येऊ लागल्या आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Aug 2015 रोजी प्रकाशित
महापालिकेसाठी ‘चाणक्यां’ची फौज!
प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा निकाल लागताच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वाऱ्यांनी वेग घेतला आहे.

First published on: 08-08-2015 at 02:30 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivili tense over kdmc elections