डोंबिवली– नव्या उमेदीने डोंबिवली विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घेतल्या दिवसा पासून पालिका बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांच्या अभियंता पथकाने डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि २७ गाव भागातील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे बहुतांशी पूर्ण केली आहेत. नागरिकांच्या खड्ड्यांविषयी तक्रारी आल्या की त्या भागाची पाहणी करुन तातडीने ते रस्ते खड्डे मुक्त केले जात आहेत. गेल्या आठवड्यापासून डोंबिवली विभागात दिवसा, रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत काम करुन बांधकाम विभागाने डोंबिवलीतील खड्ड्यांची समस्या सोडविल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

पाऊस कमी झाला तरी खड्डे भरणीची कामे पालिकेकडून केली जात नसल्याने प्रवासी, रिक्षा चालक, मोटार चालक नाराजी व्यक्त करत होते. समाज माध्यमांतून, पालिकेच्या ऑनलाईन प्रणालीतून तक्रारी करत होते. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण डोंबिवली शहरातील खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी डोंबिवलीत प्रभावीपणे सुरू आहे.

गेल्या आठवड्यात डोंबिवली बांधकाम विभागाचा नव्याने कार्यकारी अभियंता पदाचा पदभार रोहिणी लोकरे यांनी स्वीकारताच आतापर्यंत सुस्त आणि संथगतीने काम करणाऱ्या खड्डे भरणी ठेकेदार आणि अभियंत्यांना हाताशी धरुन त्यांनी गेल्या सात दिवसाच्या कालावधीत दिवस, रात्र काम करुन डोंबिवलीतील मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांशी खड्डे भरणीची कामे पूर्ण केली आहेत.

खड्डे भरलेले रस्ते

डोंबिवलीतील ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते हनुमान मंदिर-मंगल कलश-म्हसोबा चौक रस्ता, टिळक रस्त्यावरील पारसमणी-मंजुनाथ-फडके चौक रस्ता, एमआयडीसीतील अभिनव शाळा, डोंबिवली नागरी सहकारी बँक रस्ता, मानपाड रस्ता, भोपर-देसलेपाडा रस्ता, अमृते लाईन्स, कोळे-वडवली-घेसर रस्ता, घरडा चौक, कल्याण रस्ता. डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर, विष्णुनगर वाहतूक पोलीस चौकी, सुभाष रस्ता, अंबिका नगर.

खड्डे भरणीची पध्दत

पाऊस सुरू असेल तर खड्ड्याच्या आकाराप्रमाणे लहान मोठी खडी खड्ड्यात ठासून त्यावर माती टाकली जाते. पाऊस नसेल तर सिमेंट, खडी चुरा आणि घट्ट रसायनांचे कोल्डमिक्स वापरुन खड्डे भरणी केली जात आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली. ज्या रस्त्यांची खड्डयांनी चाळण झाली होती. त्या रस्त्यांवर जेसीबीने खरवडून तेथे नव्याने खडी टाकून पक्का रस्ता तयार करण्यात आला आहे. एमआयडीसी, २७ गावातील रस्ते अशा पध्दतीने केले जात आहेत.

डोंबिवली पूर्व, पश्चिम, २७ गाव भागातील सर्वाधिक वर्दळीचे, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे दिवस, रात्र पध्दतीने काम करुन पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांच्या खड्ड्यांविषयी तक्रारी आल्या की त्या भागाची पाहणी करुन तेथील खड्डे तातडीने भरुन दिले जात आहेत. रोहिणी लोकरे – कार्यकारी अभियंता डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli 27 village pit filling works in final stage zws
First published on: 18-08-2022 at 14:16 IST