ठाणे – डोंबिवली पश्चिमेतील ५२ चाळ रेल्वे मैदानावावर रेल्वे प्रशासनाकडून गेमिंग झोन उभारण्यासाठी बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र याला नागरिकांकडून विरोध करण्यात आला. तसेच सर्वपक्षीय आंदोलन देखील मागील आठवड्यात करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, आमदार राजेश मोरे यांची मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमवेत बैठक पार पडली. याबैठकीनंतर रेल्वे प्रशासनाने या मैदानावर सुरु करण्यात आलेले गेमिंग झोन उभारण्याच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे हे मैदान नागरिकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील ५२ चाळ परिसरातील रेल्वेच्या मालकीच्या या विस्तीर्ण मैदानावर रेल्वे प्रशासनाकडून गेमिंग झोन उभारण्याच्या दृष्टीने काही कामे सुरू करण्यात आली होती. या कामामुळे परिसरातील एकमेव मोठे खुले मैदान नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. अनेक वर्षांपासून या मैदानावर स्थानिक खेळाडू सराव करत आहेत, नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येतात, ज्येष्ठ नागरिक येथे वेळ घालवतात, तसेच विविध सामाजिक आणि क्रीडा उपक्रमांचे हे प्रमुख केंद्र राहिले आहे. मैदानाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्यानंतर स्थानिक नागरिक, खेळाडू आणि शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. मैदान वाचविण्यासाठी विविध स्तरांवर आवाज उठविण्यात आला.

यानंतर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या भावना आणि मैदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा केली. डोंबिवली पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून मुलांसाठी आणि खेळाडूंसाठी मोकळ्या जागांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत हे मैदान जपणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम भूमिका शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनासमोर मांडली. या पाठपुराव्याची सकारात्मक दखल घेत रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असलेले काम तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदान पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुले झाले असून खेळाडू, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मैदानाचा हा विषय केवळ सध्याच्या कामांपुरता मर्यादित न ठेवता भविष्यातही मैदानाचे अस्तित्व कायम राहावे आणि नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या जागेचा विकास व्हावा यासाठी लवकरच दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे. ५२ चाळ रेल्वे मैदान कायमस्वरूपी जतन करण्याबाबत आणि त्याचा क्रीडा व सार्वजनिक हितासाठी विकास करण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. – डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार कल्याण लोकसभा