डोंबिवली – ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील खंबाळपाडा भागात शुक्रवारी एका मजुराला चार जणांनी अडविले. त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याच्या मानेवर चाकू ठेऊन त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्याच्या जवळील मजुरीतून मिळविलेले १५ हजार रुपये चार चोरट्यांनी लुटून नेले.

शुक्रवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार खंबाळपाडा येथील ९० फुटी रस्त्यावर घडला. सुरजकुमार जवाहरलाल शर्मा (२९) असे मजुराचे नाव आहे. ते डोंबिवलीतील शेलार नाका भागात राहतात. ते कल्याण, डोंबिवली परिसरात मजुरीची कामे करून उपजीविका करतात. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मजूर सुरजकुमार हे कल्याण जवळ मजुरीचे काम करून रात्री पायी घरी परत येत होते. खंबाळपाडा येथील ९० फुटी रस्त्यावरून पायी येत असताना सर्वोदय सिंफनी, अंबर विष्टा गृहसंकुलांच्या समोरील रस्त्यावर एका अज्ञात इसमाने सुरजकुमार यांना अडविले. सुरजकुमार यांनी त्यास विरोध केला. ते पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला एक रिक्षा उभी होती. त्यामध्ये तीन जण बसले होते. आपल्या एका जोडीदाराला पादचारी जुमानत नाही लक्षात आल्यावर रिक्षामधील तीन जण खाली उतरले. त्यांनी पण सुरजकुमार यांना पकडून शिवीगाळ, मारहाण सुरू केली.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष

चारही जणांनी सुरजकुमार यांच्या जवळील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या पिशवीत तक्रारदाराची मजुरीची एकूण १५ हजार रुपयांची पुंजी होती. ही रक्कम घरी ठेवली तर चोरी होण्याची भीती असते. त्यामुळे तक्रारदार मजुरीचे पैसे स्वत:जवळ पिशवीत ठेवत होते. चारही जणांनी सुरजकुमार याला पकडून त्याच्या जवळील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यास प्रतिकार केला. मग चोरट्यांनी सुरजकुमार याच्या गळ्यावर चाकू लावून त्याला ठार मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी तक्रारदाराला ढकलून देऊन त्याच्या जवळील पैशांची पिशवी हिसकावली. त्यांनी रिक्षात बसून पळ काढला.

हेही वाचा – ठाण्यात बेकायदा नळजोडण्यांविरोधात मोहिम, मुंब्रा आणि दिव्यात ९७ बेकायदा नळजोडण्या तोडल्या

सुरजकुमार यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात चार चोरट्यांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरटे स्थानिक असण्याचा पोलिसांना संशय आहे. ९० फुटी रस्ता, सावळाराम महाराज क्रीडासंकुल भागातील झोपड्यांमध्ये चोरट्यांचे लपण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे ते याच भागातील रहिवासी असतील, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.