डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील विद्या विकास मंडळाच्या आदर्श विद्यालयात रविवारी विद्यार्थ्यांसाठी मोफत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत वय वर्षे ९ व त्यावरील ८५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ज्येष्ठ मूर्तिकार गुणेश अडवळ त्यांचे सुपुत्र सोहम अडवळ, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी श्री गणेशाच्या सुंदर मूर्ती साकारल्या.
मूर्ती बनविण्याची कला, त्यातील बारकावे व विविध तंत्रे विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आली. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पनाशक्तीला व सर्जनशीलतेला वाव देण्याची संधी मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेनुसार श्री गणेशाची मूर्ती साकारली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुबक व आकर्षक मूर्ती त्यांच्या कलागुणांची व उत्साहाची प्रचिती देत होत्या.
विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक भार पडू नये , यासाठी ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आयोजित करण्यात आली होती. मूर्ती निर्मितीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य विद्या विकास मंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आले. विद्या विकास मंडळाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
स्वानंद चक्रदेव, अनघा चक्रदेव, भूषण धर्माधिकारी, राधिका वायंगणकर यांनी कार्यशाळेच्या आयोजनापासून ते प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत महत्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना केवळ गणपतीची मूर्ती बनविण्याचे कौशल्य शिकवणे हा या उपक्रमाचा उद्देश नव्हता ,तर भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख करून देतानाच मुलांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
स्वतःच्या हातांनी साकारलेली गणेशमूर्ती हातात घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच या कार्यशाळेच्या यशाचे खरे प्रतीक ठरले. परंपरेचा सन्मान राखत नव्या पिढीतील सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
