अंबरनाथ: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत औद्योगिक क्षेत्रांमधून धोकादायक रसायने टँकरद्वारे थेट नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांपासून रात्री १२ तास टँकरबंदीचे आदेश दिले. त्याच आदेशांचा पुन्हा एकदा एक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ आणि बदलापूर या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून नेहमीच निघणाऱ्या अशा नोटिसा आणि वास्तवातील परिस्थिती यात मोठी तफावत असल्याने, या आदेशाची प्रत्यक्ष तपासणी आणि अंमलबजावणी करणार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात उल्हासनगर महानगरपालिका विरुद्ध वनशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट या खटल्याच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्र सादर करून औद्योगिक क्षेत्रांत रात्रीच्या वेळी टँकर वाहतुकीला बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. रात्रीच्या वेळी टँकरमधून धोकादायक केमिकल आणून ते नदी, नाले आणि नैसर्गिक जलस्त्रोतात सोडले जात होते. ज्यामुळे पाण्याचे प्रचंड प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याला व नदीतील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होत होता. त्यामुळे नदी, जलस्त्रोताकाठच्या नागरिकांना उग्र दर्पाचा आणि इतर शारिरीक त्रासही झाल्याचे अनेकदा समोर आले होते. त्यामुळे ठाणे शहर पोलिसांच्या विशेष शाखेकडून यासंदर्भात नोटीस काढली जात होती.
आता पुन्हा ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. धीरज कुमार बच्चु यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलमान्वये हा मनाई आदेश काढला आहे. हा आदेश ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते २९ डिसेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सलग दोन महिने अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सातत्याने अशा नोटिसा काढल्या जातात आणि काही कालावधीनंतर त्या नव्याने सुधारित करून पुन्हा प्रसिद्ध केल्या जातात. मात्र, या नोटिशीप्रमाणे स्थानिक पातळीवर कोणत्याही टँकरची प्रत्यक्षात तपासणी केली जात नाही, अशी माहिती आहे. रसायनांची वाहतूक करणाऱ्या या टँकर्सवर लक्ष ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी एमआयडीसी प्रशासनाने शहरांच्या वेशीवरती खास तपासणी केबिन बसवल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्या केबिन आजतागायत कधीही सुरू होऊ शकल्या नाहीत. या केबिनमधून कधीही एकाही टँकरची नोंद किंवा तपासणी झालेली नाही, त्यामुळे त्या केवळ शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत.
जेव्हा शहराच्या वेशीवरच तपासणी यंत्रणा कार्यान्वित नाही, तेव्हा अशा नोटिसा देऊन नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या आणि नदीत रसायने ओतणाऱ्या टँकर्सची रस्त्यावर थांबवून तपासणी करणार कोण आणि या आदेशाची गांभीर्याने दखल घेणार कोण हे प्रश्न आजही तसेच अनुत्तरित आहेत. जोपर्यंत स्थानिक पातळीवर भरारी पथके आणि एमआयडीसीच्या तपासणी केबिन प्रत्यक्ष कार्यरत होत नाहीत, तोपर्यंत असे मनाई आदेश केवळ कागदोपत्री फार्सच ठरतील, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
