डोंबिवली – पावसाची अनिश्चितता, सक्रिया झालेला एल निनो आणि राज्य शासनाने पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व प्राधिकरणांना ३१ ऑगस्टपर्यंत पुरेशा पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी २० टक्के पाणी कपातीचे निर्देश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली, अंबरनाथ विभागाने बुधवार ते शुक्रवार ४८ तास पाणी बंदचे नियोजन केले होते. परंतु, या नियोजनात बदल करण्यात आला असून २६ जून रोजी मोहरममुळे एमआयडीसीने शुक्रवारी (ता.२६) रात्री १२ ते रविवार (ता. २८) ४८ तास पाणी पुरवठा बंद करण्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
एमआयडीसीच्या या उलटसुलट पाणी पुरवठा बंदच्या नियोजनामुळे उद्योजक, नागरिक संतप्त झाले आहेत. पाणी पुरवठा बंदचे नियोजन असल्याने उद्योजकांना चार ते पाच दिवस अगोदर कंपनीत पुरेसा पाणी साठा उपलब्ध राहील याची काळजी घ्यावी लागते. यासाठी खासगी टँकरचे नियोजन करावे लागते. आता शुक्रवारी पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याने डोंबिवली, अंबरनाथ मधील कंपन्यांना पाणी पुरवठ्याचे नियोजन विचारत घेऊन शुक्रवार कंपनी बंद ठेवण्याचा वार असला तरी या दिवशी कंपन्या सुरू ठेवायच्या का याचा विचार करावा लागणार आहे, असे एका उद्योजकाने सांगितले.
पुरेशा पाणी पुरवठ्याचे नियोजन
एमआयडीसीने रविवारी (ता. २१) एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होणाऱ्या निवासी, औद्योगिक क्षेत्राचा पाणी पुरवठा बुधवार ते शुक्रवार या कालावधीत बंद ठेवण्याचे नियोजन केले होते. या कालावधीत एमआयडीसीची जांभुळ, बारवी, शहाड येथील जलशुध्दीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार होती. हे सर्व पाणी पुरवठा बंदचे नियोजन एमआयडीसीकडून करण्याचे नियोजन सुरू असताना एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. राऊत यांनी सुधारित पाणी पुरवठा बंदचे नियोजन सोमवारी जाहीर केले.
रविवारी पाणी पुरवठा बंदचे एक पत्रक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी एमआयडीसीने पुन्हा पाणी पुरवठा बंदचे सुधारित नियोजन जाहीर केल्याने नागरिक, उद्योजकांनी तीव्र संताप व्यक्त केला. हा नागरिक, कंपनी चालकांशी सुरू असलेला खेळ अधिकाऱ्यांनी थांबवावा, अशी मागणी नागरिक, उद्योजक करत आहेत.
व्हिआयपीचा फोन
एमआयडीसीच्या सुधारित वेळापत्रकात शुक्रवार ते रविवार पाणी पुरवठा बंदचे नियोजन असले आणि हे नियोजन मोहरमसाठी करण्यात येत असल्याचे म्हटले असले तरी, या फेरबदलामागे कल्याण, डोंबिवली भागावर जहागिरी गाजविणारा एक अति व्हिआयपी व्यक्ती असल्याची जोरदार चर्चा कल्याण ग्रामीण, एमआयडीसीत आहे. बुधवार ते शुक्रवार दरम्यान काही धनवानांच्या घरी विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम आहेत. या कालावधीत पाणी पुरवठा बंद राहिला तर येणाऱ्या पाहुण्यांचे, सोहळ्यात हाल होतील. हा विचार करून संबंधित धनवानांनी आपल्या नेहमीच्या संकटमोचक व्हिआयपीला संपर्क केला. आणि एमआयडीसीचा बुधवार ते शुक्रवारचा पाणी पुरवठा शुक्रवार ते रविवार करण्यास सांगा अशी गळ घातली. व्हिआयपीचा एमआयडीसीच्या वरिष्ठांना फोन येताच, तात्काळ सूत्रे हलली आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मोहरमचे निमित्त करून पाणी पुरवठा फेरबदलाचा नवीन आदेश काढला, अशी चर्चा आहे. याविषयी एमआयडीसी अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
अगोदरच डोंबिवली क्षेत्राला एमआयडीसीकडून ११० दशलक्ष लिटरऐवजी फक्त ५० ते ६० दशलक्ष पाणी पुरवठा होतो. आणि त्यात पाणी बंद आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने रहिवाशांना जुन्या विहिरी, कुपनलिकांचा आधार घ्यावा लागणार आहे. उद्योजक या पाणी बंदच्या सूचनांनी हैराण आहेत.
