डोंबिवली : डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील सामान्य, आर्थिक दुर्बल घटकांमधील रुग्णांना रास्त दरात दर्जेदार वैद्यकीय उपचाराच्या सुविधा मिळाव्यात सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे येथील एमआयडीसी भागातील मिलापनगरमधील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय पध्दतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयाला व्हेंटिलेटर सुविधेसह अतिदक्षता विभागाच्या १० खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या.

काही दिवसापूर्वी या रुग्णालयाला रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या अध्यक्ष स्नेहल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या पुढाकाराने नेत्ररोग, भूल विभागासाठी अत्याधुनिक पध्दतीची लाखो रूपयांची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर आता लाखो रूपये किमतीच्या कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि अतिदक्षता विभागातील विशेष १० खाटा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष डाॅ. संदीप घरत आणि सहकाऱ्यांच्या पुढाकारने आश्रय धर्मादाय रुग्णालयाला देण्यात आल्या.

हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टने रोटरेयिन, ज्येष्ठ उद्योजक आनंद आचार्य यांच्या डॉ. आचार्य लॅबोरेटरीज यांच्या सहकार्याने सामाजिक सेवा निधी उपक्रमांतर्गत राबविला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना, परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची अतिदक्षता सेवा उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे अध्यक्ष डाॅ. घरत यांनी सांगितले.

या उपक्रमांतर्गत अति दक्षता विभागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. यात तीन कृत्रिम श्वसन यंत्रांचा समावेश आहे. ही कृत्रिम श्वसन यंत्रे अमेरिका निवासी लता शास्त्री, नरसिंह हेगडे परिवार यांनी देणगी स्वरूपात दिली आहेत. या सुविधेमुळे रुग्णालयाची जीव वाचविणारी उपचार देण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाला रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल हर्ष माकोल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी क्लब अध्यक्ष डॉ. संदीप घरत, सचिव विनायक आगटे, उषा आचार्य, रोटेरियन सदस्य उपस्थित होते. हर्ष माकोल यांनी मागील आर्थिक वर्षात रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी आर्थिक दुर्बल घटकांचे आरोग्य आणि त्यांना रास्त दरात प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून सामाजिक सेवा निधीच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.

हा प्रकल्प आश्रय रुग्णालयाच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, सचिव नरसिंह हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. हा आयसीयू विभाग डॉ. निखिल शिंदे आणि त्यांच्या समर्पित वैद्यकीय पथकाच्या नेतृत्वाखाली पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. सामाजिक सेवा निधी प्रकल्पांची अंमलबजावणी अध्यक्ष प्रमोद शेणवई, प्रकल्प संचालक आनंद आचार्य आणि उपाध्यक्ष राजीव प्रभुणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. रोटरियन अरुण अष्टिकर, रमेश गुप्ते यांचे त्यांना सहकार्य मिळाले.

अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी सर्व देणगीदार, प्रकल्प टीम आणि आश्रय हॉस्पिटलच्या गटाचे आभार मानले. त्यांच्या अमूल्य सहकार्यामुळे हा सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम वेळेत व चांगल्या प्रकारे साकार झाला, असे त्यांनी नमूद केले. हा उपक्रम रोटरी संस्थेच्या समाजसेवा आणि आरोग्य विषयक सेवा यामधील बांधिलकीचे प्रतीक असून, समाजातील सर्व घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे ते म्हणाले.