डोंबिवली – डोंबिवलीतील ज्येष्ठ वेदमूर्ती आणि भविष्यकार लक्ष्मण कृष्णाजी पारेकर यांचे शुक्रवारी येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पारेकर गुरूजी, शास्त्री या नावाने ते ओळखले जात होते.
मागील चाळीस वर्षाहून अधिक काळ ते डोंबिवली शहर परिसरात पौरोहित्य, भविष्यकार म्हणून काम करत होते. शहरातील ते ज्येष्ठ पुरोहित होते. पौरिहित्य करताना सामाजिक सेवेच्या भावनेतून ते काम करत होते. पारेकर गुरुजी हे मूळचे पंढरपूरचे रहिवासी होते. पौरोहित्य व्यवसायानिमित्त ते कुटुंबासह डोंबिवलीत वास्तव्यास आले. शालेय शिक्षणा बरोबरच त्यांनी वेदपठण आणि पुराण शास्त्रांचा अभ्यास केला. वेद, शास्त्रे या विषयीचे मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातून नागरिक येत होते.
डोंबिवलीतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर संस्थानच्या पर्यावरण समितीचे ते सदस्य होते. गणपती मंदिरात तयार होणारे निर्माल्य, त्याचे शास्त्रोक्त विघटन या विषयी त्यांनी महत्वाचे काम केले. धर्मग्रंथांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. ठाणे येथील कोपनीश्वर मंदिरासमोरील विठ्ठल मंदिरात पारेकर गुरूजींनी सलग सहा वर्ष चातुर्मासाची प्रवचने दिली होती. श्रीमदभागवताची पारायणे ते विविध भागात करत होते. महाराष्ट्राच्या विविध भागात होणाऱ्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात व्याख्याते म्हणून पारेकर गुरूजी यांनी धर्मशास्त्र, आपल्या हिंदु धर्माच्या प्रथा आणि परंपरा आणि त्यांचे पावित्र्य अशा अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चासत्रात ते सहभागी झाले होते.
वेदपठ, धर्मशास्त्राचे ते नवोदित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांची घडण केली. गुरूजींच्या तालमीत तयार झालेले अनेक पुरोहित आता विविध भागात पुरोहिताचे काम करत आहेत. धार्मिक विधी, त्यांची मांडणी या विषयात त्यांचा हातखंडा होता. संस्कार केंद्राच्या माध्यमातून बाल वयापासून मुलांवर कसे जुन्या रितीरिवाजाप्रमाणे संस्कार झाले पाहिजेत. मुलांनी जरूर आधुनिक पध्दतीचे शिक्षण घ्यावे पण त्यांनी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे सुरू असलेल्या जुन्या प्रथा, रूढी यांना अजिबात विसरू नये, यासाठी ते आग्रही असायचे.
शालेय शिक्षणात धर्मशास्त्राचे धडे दिले पाहिजेत यासाठी त्यांचा आग्रह असायचा. यासाठी ते शासनस्तरावर अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. विदेशातून भारतात येऊन विवाह करणाऱ्या वधू, वरांना शासन दरबारी अनेक कागदपत्रे मिळविताना त्रास होत होता. ही पध्दती एक खिडकी करावी आणि विदेशातून येऊन भारतात विवाह करणाऱ्या भारतीय मुलांना विवाहापूर्वी आणि नंतर विवाह नोंदणी आणि इतर कागदपत्रे मिळताना अडचणी येऊ नयेत. यासाठी शासनाने तत्पर असावे यासाठी ते शासनस्तरावर प्रयत्नशील होते.
