डोंबिवली – संध्याकाळी कामावरून घरी परतण्याची घाई असलेल्या प्रवाशांना डोंबिवली पूर्व भागात केळकर, पाटकर रस्ता रिक्षा वाहनतळावर रिक्षा चालक मागील काही दिवसांपासून भाडे नाकारत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावरील रिक्षा वाहनतळावर सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले.
वाहनतळावर रिक्षा उपलब्ध होत नसतील तर केडीएमटीने या भागात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या वाहनतळावर सकाळपासून ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक विभागाचे पोलीस तैनात ठेवावेत, अशा मागण्या प्रवाशांनी केल्या.
यावेळी प्रवाशांनी रिक्षा चालक रिक्षा वाहनतळांवर उभे राहुन प्रवाशांना त्याच्या ठिकाणाप्रमाणे सोडण्याची हमी देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला. प्रवाशांनी रिक्षा वाहनतळावरील रिक्षा रोखुन धरल्या.
उत्स्फूर्त आंदोलन
मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व केळकर रिक्षा वाहनतळांवर संध्याकाळी सात वाजल्यापासून एकही रिक्षा चालक प्रवासी वाहतुकीसाठी आपली रिक्षा उभी करत नाही. मुसळधार पाऊस असला की रिक्षा चालक या रस्त्यावर फिरकत नाहीत. या वाहनतळावर दिवसभर रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना तत्पर सेवा देण्यास हे रिक्षा चालक टाळाटाळ करत आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
रिक्षा वाहनतळावर रिक्षा उभी केली की प्रवाशाच्या मागणीप्रमाणे शेअर भाड्याने जावे लागते. संध्याकाळच्या वेळेत वाहनतळावर रिक्षा नसल्या की प्रवासी थेट रिक्षा करून एक रकमी भाडे देण्यास तयार होतात. एका फेरीत मोठे भाडे मिळत असल्याने संध्याकाळच्या वेळेत पूर्व भागातील रिक्षा चालक नियमितच्या प्रवाशांना सोडविण्याऐवजी थेट भाड्याकडे अधिक लक्ष देतात आणि रिक्षा वाहनतळ सोडून बाजुचे चौक, रस्त्यांवर रिक्षा उभ्या करून थेट भाड्याची वाट पाहतात, असे प्रवाशांनी सांगितले.
मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार केळकर रिक्षा वाहनतळावर सुरू आहे. त्यामुळे आम्हाला ठिय्या आंदोलन करावे लागले, असे प्रवाशांनी सांगितले.
प्रवासी आक्रमक
सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी हजर झाल्या. त्यांनीही मोठे भाडे मिळण्यासाठी रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारून प्रवाशांना त्रास देत असल्याचे सांगितले. रिक्षा चालक केळकर रस्ता रिक्षा वाहनतळाच्या बाजुने निघून जातात, पण ते प्रवासी भाडे घेत नसल्याचे राणे यांनी सांगितले. रिक्षा चालकांनी प्रवासी नाकारले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार वाहतूक विभागाला आहे. याऊलट डोंबिवली वाहतूक विभागाचे हवालदार या रिक्षा चालकांची पाठराखण करत आहेत. यासंदर्भात आपण पोलीस उपायुक्तांकडे संबंधितांवर कारवाई करण्याची तक्रार केली आहे, असे मनीषा राणे यांनी सांगितले. मोठ्या रकमेचे थेट भाडे मिळविण्यासाठी रिक्षा चालकांमध्ये संध्याकाळच्या वेळेत चढाओढ लागते, असे त्या म्हणाल्या.
केळकर रस्ता रिक्षा वाहनतळांवर नियमित वाहतूक पोलीस तैनात केला जाईल. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाईल. विजय अहिरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग.
— मोठ्या रकमेचे लांबचे भाडे मिळण्यासाठी रिक्षा चालक संध्याकाळच्या वेळेत रिक्षा वाहनतळावर रिक्षा उभ्या करत नाहीत. अशा रिक्षा चालकांवर आरटीओ, वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई केली पाहिजे. मनीषा राणे सामाजिक कार्यकर्त्या.
