डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील गोग्रासवाडी भागात राहत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला चालताना एका भामट्याने मुद्दाम धक्का मारला. यानंतर भर रस्त्यात वाद घालत सुरक्षा रक्षकाला बोलण्यात गुंतवून चोराने सुरक्षा रक्षकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटून पळ काढला. सुरक्षा रक्षक काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना सोनसाखळी नसल्याचे लक्षात आले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश शिंदे (५९) असे सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ते कल्याण पूर्वेतील नेवाळी भागातील चिंचोली येथील भारत सरकारच्या भाभा परमाणु अणुसंधान विभागात वरिष्ठ सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. ते डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली परिसरात वास्तव्यास आहेत. शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी सायंकाळी चालत जात असताना एक इसम मोबाइलवर बोलत येत होता. त्याच्या हाताला चुकून धक्का लागला. काही अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे फिरत ‘तुम्ही मला ओळखले नाही का, मी सकपाळ, मला धक्का मारूनही तुम्ही माझी माफी मागितली नाही.’ असा वाद त्याने घातला. यानंतर तक्रारदार शिंदे कामासाठी पाथर्ली दिशेने निघून गेले. काही वेळाने गळ्यात सोनसाखळी नसल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.