डोंबिवली – एका खासगी कंपनीची मुदत संपलेल्या व्हिटॅमिन पौष्टिक खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या डोंबिवली कचोरे आणि भिवंडीतील दोन इसमांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोन इसमांकडून पोलिसांनी २६ लाख ६३ हजार रूपयांचा साठा जप्त केला आहे. मुदत संपलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थांच्या बाहेरील खोक्यावर मुदत वाढीची बनावट स्टिकर लावून हे इसम नागरिकांच्या या पदार्थांची विक्री करत असल्याचे आणि त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अब्दुल करीम रईस खान (४०, रा. मलंग चाळ, पत्रीपूल, कचोरे, डोंबिवली), बिरबल रामदुलाहर यादव (४३, रा. शिवाजी पॅलेस, देवजीनगर, नारपोली, भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत. मोसैक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मुदत संपलेल्या व्हिटॅमिन पुरक खाद्य पदार्थांच्या पाकिटावर, डब्याच्या बाहेरील भागात मुदत संपल्याची लेबल काढून त्या जागी बनावट पध्दतीने मुदत वाढीची लेबल लावून हे भामटे ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळत होते, असे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी सांगितले.

या भामट्यांकडुन पोलिसांनी मिलेट चोके क्रंच, मल्टि मिलेट पास्ता, निट्रीमॅक्स चाॅकलेट फ्लेव्हर, हेअर गमीज, न्युट्रिमॅक्स व्हॅनिला, स्ट्राॅबेरी फ्लेवर, मल्टिव्हिटॅमिन गमीज, ग्लुटेन फ्री पास्ता, न्युट्रिशियन सुपर ब्लेन्ड, मिलेट पानकेक चाॅकलेट फ्लेव्हर, पीनट बटर असा साठा जप्त केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कल्याण गु्न्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मोसैक वेलनेस कंपनीने उत्पादित केलेली मुदत संपलेल्या व्हिटॅमिन पुरक पौष्टिक खाद्यपदार्थांच्या पाकिटावरील, डब्यावरील लेबल काढून त्या ठिकाणी मुदत वाढीची लेबल चिकटवून त्या खाद्य पदार्थांची डोंबिवली, कल्याण, भिवंडीतील काही इसम बाजारात विक्री करत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे पथक यादृष्टिने तपास करत होते. गुुरूवारी पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ मासळी बाजारातील जुबेदा प्लाझामधील हिना मिनी बाजार दुकानात छापा टाकला. त्यावेळी तेथे मोसैक वेलनेस कंपनीची मुदत संपलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याचे छापा पथकाला आढळले.

पोलिसांनी दुकान मालक अब्दुल रईस खान यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने ही मुदत संपलेली आणि नवीन मुदत वाढीची लेबल लावलेली मोसैक कंपनीची पौष्टिक खाद्य पदार्थ त्याने भिवंडी नारपोली भागातील बिरबल यादव यांच्याकडून खरेदी केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बिरबलाचा शोध घेऊन त्याच्या गोदामातून मुदत संपलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थांचा २६ लाख ६३ हजाराचा साठा जप्त केला. या दोन्ही इसमांविरुध्द नेत्रिका कन्सलटिंग इंडियाचे सचिन गोसावी यांच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, हवालदार गुरूनाथ जरग, सुधीर कदम, सचिन भालेराव, विजय जिरे, गोरक्षनाथ पोटे, विलास कडू, सचिन कदम, दीपक महाजन, प्रवीण किनरे, उल्हास खंडारे, जयकर जाधव, प्रशांत वानखेडे, मिथुन राठोड, सतिश सोनवणे, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष रोकडे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित, अमोल बोरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.