डोंबिवली – डोंबिवलीतील भाजपचे चार माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचा एक पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते बुधवारी संध्याकाळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरातील सभागृहात शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. या चार माजी नगरसेवकांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशामुळे भाजपला सर्वाधिक धक्का बसणार आहे. शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणारे भाजपचे चारही माजी नगरसेवक हे भाजपचे निष्ठावान नगरसेवक म्हणून ओळखले जात होते. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी पक्षाने एका घरात दोन उमेदवाऱ्या न दिल्याने, उमेदवारीत डावलल्याने भाजपच्या या निष्ठावान माजी नगरसेवकांनी मग अपक्ष, मनसे पक्षात प्रवेश करून उमेदवाऱ्या मिळवून पालिका निवडणूक लढवली. पक्ष पक्षीय पाठबळ नसल्याने हे नगरसेवक पराभूत झाले.
पक्षीय राजकारणात राहण्याची आणि वावरण्याची सवय असल्याने आता अपक्ष म्हणून किंवा एक हाती पक्ष चालविणाऱ्या पक्षात स्थानिक पातळीवर कसलेच राजकीय स्थान नसल्याने या नगरसेवकांनी अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या नाराजांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि सहकारी विशेष प्रयत्न करत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरातील आपली पक्षीय ताकद वाढविण्यासाठी शिंदे शिवसेनेने इतर पक्षातील इच्छुकांना आपल्या पक्षात प्रवेश देण्याचा पुन्हा सपाटा लावला आहे. अलीकडेच भाजपने इतर पक्षातील नाराज, इच्छुकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर लगेच शिंदे शिवसेनेने भाजपला शह देण्यासाठी यापूर्वीचे भाजपमधील निष्ठावान माजी नगरसेवक आपल्या पक्षात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रवेशकर्त्या माजी नगरसेवकांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील पती, पत्नी माजी नगरसेवक, ठाकुर्ली भागातील पती, पत्नी माजी नगरसेवक, डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर भागातील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची शिंदे शिवसेनेत चर्चा आहे.
सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराला एमआयडीसीची जागा मिळवून देण्यात भाजपने की शिंदे शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली यावरून शिंदे शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आगरी समाजात स्थान मिळविण्यासाठी ही चढाओढ असल्याची चर्चा आहे. सोमवारी भाजप नेत्यांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करून एमआयडीसीकडून मंदिराला जागा मिळवून भाजपने महत्वाची भूमिका बजावली हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर शिंदे शिवसेनेने आमच्या नेत्यांनी ही जागा मिळवून देण्याचा महत्वाची भूमिका बजावली अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे पिंपळेश्वर महादेव मंदिराचा विषय आता चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील या निष्ठावंत मंडळींचा पक्षप्रवेश सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात ठेवण्यात आला आहे.
निष्ठावंत नाराज
शिंदे शिवसेनेच्या या बेरजेच्या राजकारणात मात्र निष्ठावंत मंडळींचा बळी जाण्याची भीती निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत. आता स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्त्यांची चर्चा आहे. ही अयाराम मंडळी आल्यानंतर स्वीकृत म्हणून पालिकेत दाखल झाली तर निष्ठावान शिवसैनिक आपोआप बाजुला फेकला जाणार आहे. पुन्हा त्याला पालिकेत किंवा मानाच्या पदावर जाण्याची संधी मिळणार नाही, अशी भीती निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत. आता मनसे, ठाकरे गटातील हे अयाराम असले तरी ते मुळचे भाजपचे निष्ठावंत नगरसेवक म्हणून ओळखले जातात. त्यांची अनेक वर्षांची निष्ठा ही भाजपशीच होती. त्यामुळे या माजी नगरसेवकांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
