Dombivli Bullet driver grandfather grandson seriously injured in bullet impact dombivli news ysh 95 | Loksatta

डोंबिवलीत बुलेट चालकांचा धुमाकूळ, बुलेटच्या धडकेत आजोबा, नातू गंभीर जखमी

ठाकुर्ली मधील ९० फुटी रस्त्याने दुचाकीवरुन चाललेल्या आजोबा, नातवाच्या दुचाकीला गुरुवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका बुलेट चालकाने जोरदार ठोकर दिली.

डोंबिवलीत बुलेट चालकांचा धुमाकूळ, बुलेटच्या धडकेत आजोबा, नातू गंभीर जखमी
चेन्नईत दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. (image-the indian express)

डोंबिवली: ठाकुर्ली मधील ९० फुटी रस्त्याने दुचाकीवरुन चाललेल्या आजोबा, नातवाच्या दुचाकीला गुरुवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका बुलेट चालकाने जोरदार ठोकर दिली. दुचाकीवरील आजोबा, नातू बुलटेच्या धडकेने दुचाकीसह रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. या दोन्ही जखमींना मदत करण्याऐवजी बुलेट चालक पळून गेला. पादचाऱ्यांनी मदत करुन आजोबा, नातवाला रुग्णालयात दाखल केले.

डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून बुलेट चालकांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज करत बुलेट स्वार आपण विमान चालवितो अशा अविर्भावात बुलेट चालवितात. अनेक वेळा बुलेट मालकाची मुलेच बुलेटवर अधिक असतात. त्यामुळे वाट्टेल तशा वेगाने बुलेट चालवून ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. गेल्या वर्षी कल्याण, डोंबिवलीत वाहतूक विभागाने बुलटे तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्याचप्रमाणे आता बुलेट चालकांचा धुमाकूळ वाढल्याने या वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डोंबिवली पूर्वेत सावरकर रस्ता, फडके रस्ता, पश्चिमेत दिनदयाळ रस्ता, गणेशनगर रस्ता, ९० फुटी रस्त्यावर बुलेट चालकांची बुलेट चालविण्याची स्पर्धा लागते. या वेळी बुलेट चालकाचे नियंत्रण सुटले की दिसेल त्या वाहनाला धडक देतो. यामधून अपघात होत आहेत.

हेही वाचा >>> ठाणे जिल्हा रुग्णालय नुतनीकरणात बाधित होणाऱ्या ४७ वृक्षांचे होणार पुर्नरोपण

टिळकनगर पोलिसांनी सांगितले, पांडुरंग निकम (५६, रा. तिसाई मंदिराजवळ, कल्याण) हे गुरुवारी रात्री साडे आठ वाजता ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याने आपल्या नातवाला स्कुटीवर बसवून रस्त्याच्या एका बाजुने कल्याण दिशेने चालले होते. स्कुटी ९० फुटी रस्त्यावरील सर्वाेदय मंगल इमारती मधील डीएनएस बँकेसमोर येताच अचानक पाठीमागून भरधाव वेगाने एक बुलेट (पिवळ्या रंगाची) स्वार वेगाने कर्णकर्कश आवाज करत आला. तो बाजुने जाईल असे वाटले असतानाच बुलेट चालकाने पांडुरंग यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराने ठोकर दिली. पांडुरंग नातवासह दुचाकीवरुन फेकले गेले. ते रस्त्याच्या बाजुला पडले. आजोबा, लहान मुल रस्त्याच्या बाजुला आपल्या चुकीमुळे पडले आहे म्हणून मदत करण्याऐवजी बुलेट स्वार घटनास्थळावरुन पळून गेला. त्या भागातून एक रिक्षा चालक, पादचारी रोहित शर्मा तेथून चालले होते. त्यांनी पांडुरंग, त्यांचा नातू यांना तात्काळ रिक्षेतून रुग्णालयात दाखल केले. पांडुरंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात बुलेट चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून बुलेट स्वाराचा तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 15:29 IST
Next Story
ठाणे जिल्हा रुग्णालय नुतनीकरणात बाधित होणाऱ्या ४७ वृक्षांचे होणार पुर्नरोपण