डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावर ब्राह्मण सभेसमोरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या सुतिकागृहाच्या जागी भव्य कर्करोग रुग्णालय उभारणीचे काम मागील दोन वर्षापासून अतिशय संथगतीने सुरू आहे. या कर्करोग रुग्णालय उभारणीच्या कामासाठी ५० फूट खोल खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खोदलेल्या खड्ड्यातील माती खचू लागली. या खड्ड्या लगत असलेल्या मैत्री रुक्मिणी सदन इमारतीची संरक्षक भिंत शुक्रवारी रात्री खड्ड्यात कोसळली. तर, सायं विसावा इमारतीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले.

शुक्रवारी दिवसभर या रुग्णालय उभारणीचे ठेकेदार, बांधकाम सल्लागार पालिका अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे विचार करून या खड्ड्याच्या आतील भागातून आधार भिंत उभारणीचा विचार केला. मुसळधार पावसामुळे मैत्री रुक्मिणी, विसावा इमारतींच्या संरक्षक भिंतीकडील भाग शनिवारी सकाळपासून आणखी खचू लागला. या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्याने आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेविका रंजना पेणकर यांनी या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांबरोबर चर्चा केली. आगामी धोका ओळखून या दोन्ही इमारती तातडीने रहिवास मुक्त करण्याचा निर्णय घेतला.

५० कुटुंबियांचे स्थलांतर

मैत्री रुक्मिणी सदन इमारतीत १६ कुटुंब राहतात. सायं विसावा इमारतीत ३४ कुटुंब राहतात. या इमारतींमधील कुटुंबीयांना आवश्यक तेवढेच सामान घेऊन घराबाहेर पडण्याच्या सूचना पालिकेकडून करण्यात आल्या. मुसळधार पावसात घर सोडावे लागत असल्याने सर्वच कुटुंबीयांना गहिरवरून आले. घडलेल्या या प्रकाराबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली.

मागील दोन ते तीन वर्षात या दोन्ही इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. कर्करोग रुग्णालय उभारणी करणाऱ्या ठेकेदाराच्या नियोजन शून्य कामामुळे आम्हाला त्रास असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. एका वजनदार लोकप्रतिनिधीचे कर्करोग रुग्णालयाशी घनिष्ट संबंध असल्याने ठेकेदाराच्या संथगती कामाविषयी राजकीय पातळीवर स्मशान शांतता आहे.

मैत्री रुक्मिणी सदनच्या जागी यापूर्वी सन १९५२ पासून मातोश्री रुक्मिणीबाई निवास बंगला होता. उडपीनाथ माधवराव कुलकर्णी पुनर्विकसित मे. मैत्री क्रिएशन्सचे संचालक राजू जाधव यांनी सन २०२४ मध्ये या इमारतीची नव्याने उभारणी केली. मुग्धा फणसाळकर या इमारतीच्या वास्तुशिल्पकार आहेत.

कायदेशीर कारवाईची चाचपणी

कर्करोग रुग्णालयाच्या खड्ड्यामुळे आपल्या नवीन इमारतींना हानी पोचल्याने याप्रकरणी संबंधित यंत्रणेवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार काही रहिवासी करत आहेत. आजुबाजुला इमारती, रस्ते आहेत. त्यामुळे तुम्ही खूप खोदकाम करू नका, असे या भागातील रहिवाशांनी खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराला सांगितले होते. त्याने ऐकले नाही, असे रहिवासी सांगतात. सुतिकागृहाची डोंबिवलीकरांची नाळ जुळली आहे. याठिकाणी पालिकेने सामान्य रुग्णालय उभारावे, अशी जुन्या डोंबिवलीकरांची अपेक्षा होती. ही जागा कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी योग्य नाही, अशा चर्चा यापूर्वी झाल्या होत्या. एक वजनदार विकासपुरूष लोकप्रतिनिधीच्या हेकेखोरपणामुळे पालिका, शासकीय यंत्रणांना नांगी टाकून सुतिकागृहाच्या जागी कर्करोग रुग्णालय उभारणीचा हेका मान्य करावा लागला असल्याचे समजते.

इमारतींभोवती पोलीस

मैत्री रुक्मिणी, सायं विसावा इमारतींमधील घरे बंद आहेत. याठिकाणी चोऱ्या होऊ नयेत म्हणून पोलीस, पालिका अधिकाऱ्यांची चक्राकार पध्दतीने नेमणूक करण्यात आली आहे.

या इमारतींना कोणताही धोका नाही. तरीही खड्ड्यातील या दोन्ही इमारतींलगतच्या मजबूत आधाराचे काम पूर्ण झाले की या दोन्ही इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा आपल्या घरात राहण्यास देण्यात येणार आहे. या रहिवाशांची तात्पुरत्या स्वरुपात सुयोग्य ठिकाणी निवासाची पालिकेकडून सोय करण्यात आली आहे. राहुल दामले उपमहापौर.

फोटो ओळ

खड्ड्यांमुळे खचलेल्या इमारतींचा भाग.