डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भावे सभागृहाजवळील अंबिकानगर भागात मुंबईतून डोंबिवलीत आलेल्या एका नागरिकाचा हात पायी जाताना दुसऱ्या पादचाऱ्याच्या हाताला चुकून लागला. यावेळी दुसऱ्या पादचाऱ्याने पुढे गेलेल्या पादचाऱ्याला पाठीमागून ओ मामा, मामा थांबा, असे बोलून थांबून ‘तुम्ही खुशाल मला हाताची चापट मारून पुढे जाता. माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर तुम्हाला मारला असता’. त्यानंतर पादचाऱ्याने नागरिकाला मिठी मारली आणि हात चलाखी करून नागरिकाच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची साखळी लबाडीने काढून घेऊन पळ काढला.
आपल्याला मामा म्हणून हाक मारणारा पादचारी हा गर्दुल्ला, मद्यपी असल्याचा संशय मुंबईतील नागरिकाला आला. ते सुरूवातीला त्याच्यापासून दूर होऊ लागले. त्या पादचाऱ्याने स्वताहून मुंबईतून आलेल्या नागरिकाच्या गळ्यात मिठी मारली. आणि सोनसाखळी लबाडीने काढून घेतली. विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. विशेषता ज्येष्ठ, वृध्द नागरिकांना हे भुरटे चोर लक्ष्य करत आहेत.
नक्की काय घडले
जयेश शानभाग यांचे डोंबिवलीत अंबिकानगरमध्ये घर आहे. ते सध्या आपल्या कुटुंबीयांसह नोकरीच्या सोयीसाठी मुंबईत पवई भागात राहतात. गेल्या आठवड्यात ते डोंबिवलीतील घरी आले होते. रात्री दहा वाजता ते डोंबिवली पूर्वेतील आपल्या नातेवाईकाच्या घरी पायी चालले होते. अंबिकानगर संकुलाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना जयेश शानभाग यांचा हात चुकून बाजुने चाललेल्या तीस वयोगटातील तरूणाला लागला. जयेश पुढे काही अंतर गेल्यावर त्यांना हात लागलेल्या तरूणाने पाठीमागून मोठ्याने हाक मारली. ओ मामा, ओ मामा करून थांबवले.
संबंधित तरूण आपणास मामा बोलून का थांबवतो म्हणून तक्रारदार बुचकळ्यात पडले. तो तरूण जयेश यांच्या दिशेने आला. ‘तुम्ही मला हाताची चापट मारली आणि खुशाल तुम्ही पुढे गेलात. माझ्या ठिकाणी कोणी असता तर तुम्हाला मारले असते,’ अशी अरेरावीची भाषा तरूणाने तक्रारदार जयेश यांच्या बरोबर केली. त्यानंतर तात्काळ तरूणाने तक्रारदाराला मिठी मारली. तरूणाच्या बोलण्यातून तो मद्यपी असावा असा संशय तक्रारदाराला आला. ते त्याच्यापासून दूर जाऊ लागले. तरी त्या तरूणाने जबरदस्तीने जयेश शानभाग यांच्या गळ्यात पुन्हा मिठी मारून ‘काय तुम्ही निघून जाता’ असे बोलून हात चलाखी करून तक्रारदार जयेश शानभाग यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याची ४८ हजार रूपये किमतीची साखळी काढून घेतली.
तक्रारदाराला संशय आल्याने त्यांनी पुढे जाऊन गळ्याला हात लावला तर त्यांना गळ्यात सोनसाखळी आढळली नाही. ते पुन्हा माघारी तो तरूण दिसतो का हे पाहण्यासाठी आले, पण तो पर्यंत तो तरूण पळून गेला होता. त्या भुरट्या चोरानेच आपली सोनसाखळी चोरून नेली असल्याचा संशय व्यक्त करून तक्रारदाराने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

