डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील मासळी बाजार येथून स्काॅयवाॅकवरून एक एक महिला शनिवारी संध्याकाळी जिना चढत होती. महिलेच्या गळ्यात सोन्याचे ६५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र होते. त्यावेळी टपून बसलेल्या दोन भुरट्या चोरांपैकी एका चोरट्याने या महिलेच्या पाठीमागे जाऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. एका रिक्षा चालकाच्या हा प्रकार लक्षात येताच रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारांनी पंडित दिनदयाळ रस्त्यावर या चोरट्याचा माग काढला. या चोरट्याने आपल्या साथीदाराच्या ताब्यात चोरीचे मंगळसूत्र देऊन पळ काढला.
वर्षा संतोष भोईर असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्ता भागातील गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहतात. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
हिंदी चित्रपटातील थरार दृश्याप्रमाणे ही घटना शनिवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान विष्णुनगर मासळी बाजाराजवळ घडली. मिळालेली माहिती अशी, की शनिवारी संध्याकाळी विष्णुनगर मासळी बाजार भागात काही रिक्षा चालक प्रवासी सोडण्यासाठी गेले होते. यामध्ये देवीचापाडा गोपीनाथ चौकात राहणारे रिक्षा चालक जगदीश म्हात्रे हेही होते. मासळी बाजाराजवळील स्कायवाॅकवर जिन्यातून एक महिला जात होती. या महिलेच्या गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र होते. यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या दोन भुरट्या चोरांनी या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा निर्णय घेतला.
महिला जिन्यावर जाताच पाठीमागून जाऊन एका भुरट्या चोराने या महिलेच्या मानेवर जोराने थाप मारली. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मानेवर जोराने फटका बसल्याने आणि सोनसाखळी गायब झाल्याने महिला घाबरली. हा प्रकार तेथे उभ्या असलेल्या रिक्षा चालक जगदिश म्हात्रे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ भुरटा चोरटा पळून जात असलेल्या रस्त्याने रिक्षा वेगाने नेऊन चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भुरट्या चोरट्याचा साथीदार घाईत आपण त्या चोरट्याला पकडू असा देखावा निर्माण करून म्हात्रेंच्या रिक्षेत बसला. रिक्षेतील पादचारी आपणास चोरट्याला पकडण्यास साहाय्य करील असे म्हात्रे यांना वाटले. चोरटा घनश्याम गुप्ते रस्त्याने गोमांतक बेकरी गल्लीतून दिनदयाळ रस्ता भागात पळाला.
रिक्षा चालक म्हात्रे यांनी चोरट्याला दोन वेळा रिक्षा आडवी टाकून अडविण्याचा प्रयत्न केला. रिक्षेतील चोरट्याचा साथीदार रिक्षा चालकाला चोरट्याला पकडू नये यासाठी प्रयत्न करत होता. आपल्या रिक्षेत बसलेला पादचारी हा प्रवासी नसून तो चोराचा साथीदार आहे हे लक्षात आल्यावर रिक्षा चालकासह इतर पादचाऱ्यांनी रिक्षेत बसलेल्या चोरट्याच्या साथीदाराला पंडित दिनदयाळ रस्त्यावर पकडून त्याला भरपूर प्रसाद दिला.
दरम्यान मंगळसूत्र चोरून पळालेला चोरटा दिनदयाळ रस्त्यावरील एका निर्माणाधिन इमारतीत घुसला. तेथील पडलेल्या बांबू आणि लाकडांमध्ये लपून बसला. इमारतीमधील मजूर, पादचारी या चोरट्याला तेथे शोधू लागले. त्यावेळी भुरटा तेथून बाहेर पडताच लोकांनी ओरडा करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने जवळील मंगळसूत्र पादचाऱ्यांनी पकडून ठेवलेल्या चोरट्याच्या साथीदाराच्या हातात दिले. तेथून लोकांना चकवा देऊन तेथून तो पसार झाला. चोराचा एक साथीदार मात्र लोकांच्या ताब्यात होता. एका जागरूक नागरिकाने तात्काळ पोलिसांना ही माहिती दिली. विष्णुनगर पोलिसांनी भुरटयाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एन. मोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
